शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक
By कमलेश वानखेडे | Published: December 7, 2023 05:04 PM2023-12-07T17:04:29+5:302023-12-07T17:04:58+5:30
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला.
नागपूर : विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.
वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्हे उध्वस्त झाले. मात्र, सरकारने एक हजार तालुक्यांमध्ये मदतीसाठी हात वर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना तीतडीच्या मदतीची अपेक्षा असताना पूर्णत: पंचनामे देखील झाले नाहीत. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नव्हता. नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : फडणवीस
केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांनी मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसृश्य जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हाजर कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.
फडणवीस म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.