राज्य अनलॉकच्या दिशेने, पण मास्कपासून मुक्ती नाही : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 11:26 AM2022-02-12T11:26:39+5:302022-02-12T11:31:33+5:30
आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहतील. परिस्थिती नियंत्रणात येत असून राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, सध्याच मास्कपासून मुक्ती नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
नागपूर : राज्यात कोविड संक्रमणाची गती मंदावली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांमध्ये सूट देण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविला आहे. आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहतील. परिस्थिती नियंत्रणात येत असून राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, सध्याच मास्कपासून मुक्ती नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्य अनलॉक करीत असताना चाैथ्या लाटेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत मुंबईनंतर राज्यभर गतीने संक्रमण वाढले. आता रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत राज्य पूर्णपणे अनलॉक होऊ शकते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कामकाज सल्लागार समिती निर्णय घेणार
- अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. १५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. तीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.