विजय वडेट्टीवार खात्यांचा कार्यभार स्वीकारणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 09:51 PM2020-01-07T21:51:34+5:302020-01-07T21:52:48+5:30
मंत्रिमंडळ विस्तारात दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे प्रचंड दुखावले असून त्यांची नाराजी कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार नसून बुधवारी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनालादेखील जाणार नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारात दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे प्रचंड दुखावले असून त्यांची नाराजी कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार नसून बुधवारी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनालादेखील जाणार नाहीत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाही. येत्या आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसच्या प्रतिकूल काळात वडेट्टीवार यांनी विदर्भात कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले. विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भातील कॉंग्रेस उमेदवारांना तन मन धनाने सहकार्यही केले. विरोधी पक्षनेता राहिल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाचा मान मोठा असतो व हे पद भूषविल्यानंतर दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज झाले. वडेट्टीवार यांना दुय्यम खाती दिल्यामुळे त्यांचे समर्थकदेखील विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.
भारतीय संविधानाच्या १२६व्या सुधारणा विधेयक २०१९ च्या ठरावास संमती देण्यासाठी बुधवारी मुंबईत एक दिवसांचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नवीन मंत्र्यांचा परिचयदेखील होणार आहे. या अधिवेशनाला संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. परंतु या अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. शिवाय ते मंत्रालयाचा कार्यभारदेखील स्वीकारणार नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतरदेखील दुय्यम खाती मिळाली असल्याने ते सहाजिकच दुखावलेले आहेत. पक्षश्रेष्ठींना त्यांनी आपली भावना कळविली आहे. कुठल्याही क्षणी ते धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. वडेट्टीवार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
नाराज आमदारांनी साधला संपर्क
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये मंत्री किंवा राज्यमंत्रिपद मिळेल अशी अनेक कॉंग्रेस आमदारांना अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षापूर्ती न झाल्याने काही आमदार नाराज झाले आहेत. मंत्रिपद न मिळालेल्या कॉंग्रेस आमदारांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.