ओबीसी महिला साहित्य संमेलनाध्यक्षपदी विजया मारोतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 08:02 PM2019-12-18T20:02:45+5:302019-12-18T20:04:39+5:30
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे २५ व २६ डिसेंबर रोजी पहिले ‘फुले-शाहू-आंबेडकर महिला साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे २५ व २६ डिसेंबर रोजी पहिले ‘फुले-शाहू-आंबेडकर महिलासाहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्याच संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखिका प्रा. विजया मारोतकर यांची निवड झाली आहे.
संमेलनाचे उद्घाटन लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकरराव वाकोडे यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्षाची जबाबदारी वृंदा विकास ठाकरे यांनी स्विकारली आहे. संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांची कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेख, समीक्षा, बालसाहित्य, चरित्रलेखन आदी प्रकारात एकूण ३१ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना साहित्यसेवेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘पोरी जरा जपून’ हा त्यांनी निर्मित केलेल्या कार्यक्रमाला विविध राज्यात चांगले यश मिळाले आहे. या द्विदिवसीय संमेलनाचे संयोजन ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या संध्या राजूरकर यांनी केले आहे. समन्वयक प्रा. माधुरी गायधनी आहे. संमेलनात ओबीसी महिलांद्वारे लिहिले गेलेल्या काही पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे याशिवाय ओबीसी चळवळीत अस्मिता जागरणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केल्या जाणार आहे.