अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
By Shrimant Mane | Published: September 17, 2024 10:34 PM2024-09-17T22:34:36+5:302024-09-17T22:35:29+5:30
या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत.
नागपूर: अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित केलेल्या डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर 21- सेंचुरी’ या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत.
वॉशिंग्टन, डी.सी.येथे सरकारमधील किंवा सरकारबाहेरील वरिष्ठ व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या तीन आठवड्यांचा फेलोशिप प्रोग्राममध्ये, गंभीर समस्या असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण-स्तरीय जबाबदाऱ्या, नेतृत्व विकास सुलभ करणे, योग्य धोरणे आणि कार्यक्रम विकसित करण्याची क्षमता मजबूत करणे आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर बहुपक्षीय सहयोग आणि सहकार्यास प्रोत्साहन देणे हा या फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. दिनांक 18 सप्टेंबर पासून श्रीमती बिदरी या जॉन एफ. कॅनडी स्कूल येथे आयोजित लिडरशिप प्रोग्रामसाठी उपस्थित राहणार आहेत.
या फेलोशिपसाठी जगातील 12 देशांतील प्रतिष्ठित 12 व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये भारतातून श्रीमती बिदरी यांचा समावेश आहे. या नामांकनासाठी युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF), नवी दिल्लीच्या फुलब्राइट आयोगाकडून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्वर्ड यूनिवर्सिटीच्या जॉन एफ. कॅनडी स्कूल ऑफ गवर्नमेंट येथे, २१ व्या शतकासाठी नेतृत्व: अराजकता, संघर्ष आणि धैर्य या विषयावर कार्यकारी-स्तरीय सेमिनारमध्ये नामाकंन असलेल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या फेलोशिप अंतर्गत जागतिक स्तरावरील प्रमुख वक्ते व निवड झालेले सहभागी यांच्यामध्ये संवादात्मक चर्चांमध्ये केस स्टडीजसह नेतृत्वाभोवती निर्माण होणाऱ्या प्रमुख समस्या आणि आव्हानांवर चर्चा व उपाययोजंनावर परस्पर चर्चा होणार आहे. यामध्ये नेतृत्वांशी संबंधित धोरणे, नेतृत्व करण्याच्या नवीन पद्धतींचा परिचय तसेच नेतृत्व व अधिकारी यांच्यामधील संबंध कसे असावे त्यावरील प्रभाव आणि वैयक्तिक आणि संस्थात्मक गतिशीलतेमधील बदल व्यवस्थापन या ठळक मुद्द्यांचा समावेश आहे.
डॉ.विपीन इटनकर यांचेकडे अतिरिक्त कार्यभार
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अमेरिकेतील फेलोशिपच्या कार्यकाळात विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेकडे देण्यात आला आहे.