उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक तयारीचा विजयवर्गीय यांनी घेतला आढावा
By योगेश पांडे | Published: August 28, 2024 11:09 PM2024-08-28T23:09:50+5:302024-08-28T23:11:20+5:30
नागपुरातील तीन मतदारसंघांतील भाजपच्या नियोजनावर मंथन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत शहरातील तीन मतदारसंघात भाजपच्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाच्या नियोजनाबाबत त्यांच्याच उपस्थितीत विजयवर्गीय यांनी जाणून घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना समन्वय राखत तळागाळापर्यंत पोहोचण्याची सूचना केली.
विजयवर्गीय यांच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघांचा प्रभार आहे. मागील आठवड्यात त्यांनी नागपूर ग्रामीणमधील सहाही मतदारसंघांचा आढावा घेतला होता. बुधवारी शहरातील दक्षिण, पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी नियोजन जाणून घेतले. यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व एकूण नियोजनाचा आढावा घेतला. लोकसभेचे निकाल विसरून जनतेमध्ये जाऊन तळागाळात काम करण्यावर भर द्या अशी सूचना विजयवर्गीय यांनी केेली.
तीन वेगवेगळ्या बैठकी त्यांनी घेतल्या. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी या विधानसभा मतदारसंघांचे राजकीय चित्र त्यांच्यासमोर मांडले. तीनही मतदारसंघातील भाजपची बलस्थाने व त्रुटी यावर मंथन झाले. जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विकासयोजना पोहोचवा. तसेच त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना अपेक्षित उपक्रम व कार्यक्रम राबवा असे निर्देश विजयवर्गीय यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आ.मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, निवडणुकीपर्यंत विजयवर्गीय हे प्रत्येक मतदारसंघाचा नियमित कालावधीने आढावा घेणार आहेत.
संघ स्मृतिमंदिराला दिली भेट
दरम्यान, सकाळच्या सुमारास विजयवर्गीय यांनी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली. सुमारे अर्धा तास ते रेशीमबाग येथे होते. त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन देखील अभिवादन केले.
ममता बॅनर्जी या हिटलरसारख्याच हुकूमशहा
यावेळी विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना थेट हिटलरसोबत केली आहे. आजच्या काळात हिटलरनंतर जर कोणी हुकूमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमध्ये पोलीस, समाजकंटक आणि राजकारणी यांच्यात परस्पर संबंध आहेत. महिला डॉक्टरचा बलात्कार करणाऱ्याकडे पोलिसांची बाईक होती. असा सवाल त्यांनी विचारला. महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांच्या पाठीशी असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला.