विक्रमवीर अमित यांना आॅरेंजसिटीचा मानाचा मुजरा

By admin | Published: July 5, 2017 01:55 AM2017-07-05T01:55:15+5:302017-07-05T01:55:15+5:30

दिग्गज सायकलिस्टला खुणावणाऱ्या परंतु सायकलपटूंचे लक्ष्य असलेल्या ‘रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करीत देशातील पहिले सायकलपटू होण्याचा विक्रम नोंदविणारे....

Vikramviar Amit has received the honorary title of OrangeCity | विक्रमवीर अमित यांना आॅरेंजसिटीचा मानाचा मुजरा

विक्रमवीर अमित यांना आॅरेंजसिटीचा मानाचा मुजरा

Next

‘आयर्न मॅन’चे आगमन : शहरातील २५० सायकलिस्टकडून जल्लोषात स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिग्गज सायकलिस्टला खुणावणाऱ्या परंतु सायकलपटूंचे लक्ष्य असलेल्या ‘रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करीत देशातील पहिले सायकलपटू होण्याचा विक्रम नोंदविणारे डॉ. अमित समर्थ यांचे मंगळवारी आॅरेंज सिटीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पाच हजार किलोमीटरची आव्हानात्मक शर्यत १२ दिवसांत पूर्ण करून डॉ. अमित हे सोमवारी मध्यरात्री मायदेशी परतले. आज सकाळी आगमनानंतर काही तासात नागपुरातील २५० हून अधिक सायकलिस्टनी त्यांच्या सन्मानार्थ शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सायकल रॅली काढत या कामगिरीबद्दल मानाचा मुजरा केला.
शहराच्या विविध भागात पहाटेच्यावेळी सायकलपटू फिटनेसकरता सायकलिंग करताना दिसतात. मंगळवारचा दिवस सायकलिस्टकरिता अविस्मरणीय ठरला. सर्वांचा आवडता खेळाडू, शहराचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदवणाऱ्या ‘आयर्न मॅन’ डॉ. अमित यांच्या स्वागताकरिता चाहत्यांनी आॅरेंज सिटी चौकात गर्दी केली होती. डॉ. अमित यांच्या चाहत्यांनी एका खुल्या जीपमधून रॅली काढण्याआधी जोरदार टाळ्या वाजवूत स्वागत केले, अनेकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. रॅली आठरस्ता चौक, शंकरनगर, वेस्ट हायकोर्ट रोड, जपानी गार्डन, फुटाळा तलाव परिसर मार्गे अमरावती मार्गावरील भास्कर सभागृहात दाखल झाली. याठिकाणी डॉ. अमित यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सारथी बनले सचिन...
यावेळी डॉ. समर्थ यांच्यासोबत संपूर्ण रॅमदरम्यान नेव्हीगेटरची भूमिका बजावणारे सचिन पालेवार यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. मला सुरुवातीपासूनच माहिती होते रॅमसारखी अत्यंत खडतर मानली शर्यत अमितच पूर्ण करू शकतो. त्यामुळे आपण सतत त्याने यासाठी प्रयत्न करावा असे सांगत होतो. केवळ रॅमदरम्यानच नव्हे तर सचिन, या शर्यतीकरिता असलेल्या पुणे ते गोवा या नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या पात्रतेच्या शर्यतीतही डॉ. अमित यांच्यासोबत होते. रॅमदरम्यान अमित दिवसाला केवळ २ ते ३ तासांची विश्रांती घेत असत. पॅसिफिक ते अ‍ॅटलांटिक कोस्ट या प्रवासादरम्यान बरेचदा सायकल चालवताना जेवण घ्यावे लागे, असा अनुभवही पालेवार यांनी सांगितला. अर्थात मुकुल समर्थ, जितेंद्र नायक आणि रेणुका नायक हे अन्य सहकारी देखील आज अमितच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

हे सांघिक यश : डॉ. अमित
सत्काराने भारावलेले डॉ. अमित उत्तर देताना म्हणाले,‘ हे केवळ माझे एकट्याचे यश नाही. २० लोकांची चमू माझ्यावर सतत लक्ष ठेवून होती, लक्ष्य निर्धारित वेळेत कसे गाठता येईल यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यामुळे हे सांघिक यश आहे.’ रॅममध्ये डॉ. अमित समर्थ यांनी पाच हजार किलोमीटरचे अंतर ११ दिवस २१ तास ११ मिनिटात पूर्ण केले. याच शर्यतीत दुसरे भारतीय व दुसऱ्यांदा सहभागी होत असलेले नाशिकचे श्रीनिवास गोकुलनाथ यांनीही ही स्पर्धा पूर्ण केली.

शिवगर्जनातर्फे ढोलताशांचा गजर...
सत्कारानंतर शिवगर्जना ढोलपथकाने डॉ. समर्थ यांच्या सन्मानार्थ केलेल्या वादनाला शेकडो नागरिकांनी चांगलीच दाद दिली. सत्कारादरम्यान डॉ. अमित यांचे आई-वडील, पत्नी, सहा वर्षीय मुलगा अयान उपस्थित होते.

Web Title: Vikramviar Amit has received the honorary title of OrangeCity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.