विलास डांगरे यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: May 10, 2017 02:39 AM2017-05-10T02:39:01+5:302017-05-10T02:39:01+5:30
शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांची पुण्यातील डॉक्टर्स डिरेक्टरी आॅफ इंडिया (डीडीआय) हेल्थकेअर पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांची पुण्यातील डॉक्टर्स डिरेक्टरी आॅफ इंडिया (डीडीआय) हेल्थकेअर पुरस्कार समितीने २०१७ च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. डीडीआय ही सर्व पॅथीच्या डॉक्टरांसाठी सॉफ्टवेअर बनविणारी एक आघाडीची कंपनी आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. हा पुरस्कार १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे आयोजित एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. होमिओपॅथीच्या क्षेत्रात समर्पण भावनेने केलेली रुग्णसेवा, रुग्णसेवा करताना जपलेली नैतिक मूल्ये, समाज आणि रुग्णांप्रति असलेली आस्था व जबाबदारीची ठेवलेली जाणीव आदी बाबी विचारात घेऊन डॉ. विलास डांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे समितीचे संयोजक डॉ. मनोज देशपांडे यांनी डॉ. विलास डांगरे यांना कळविले आहे. डॉ. डांगरे वयाच्या ६० वर्षानंतरही दररोज १५० ते २०० रुग्णांना तपासतात. होमिओपॅथीची औषधे देऊन त्यांनी रुग्णांना दुर्धर आजारातून बरे केले आहे.
त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन अनेक संस्थांनी आजपर्यंत त्यांचा गौरव केला आहे. यापुर्वी त्यांना बॅरि. शेषराव वानखेडे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या शिवाय त्यांना नागपूर भूषण, विदर्भ गौरव पुरस्कार, ज्ञानेश्वर पुरस्कार, मनपाचा हेडगेवार स्मृती पुरस्कार, मैत्री गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.