कोरोनाला रोखण्यासाठी पाटणसावंगीत गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:02+5:302021-05-07T04:09:02+5:30
पाटणसावंगी : सावनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यात पाटणसावंगी या गावात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गावातील वाढते संक्रमण ...
पाटणसावंगी : सावनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यात पाटणसावंगी या गावात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गावातील वाढते संक्रमण लक्षात घेता, आता येथे गावबंदी करण्यात आली आहे. पाटणसावंगीतील गावठाण भागात वर्दळ थांबविण्यासाठी प्रवेश मार्गांवर बांबूचे अडथळे टाकण्यात आले आहेत. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने कडक समज देण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने निर्णय घेऊन वर्दळ थांबविण्यासाठी मुख्य रस्त्यावर बांबूचे अडथळे केले आहेत. गावात एकूण पाच मुख्य रस्ते आहेत. पाचही मार्गावर बांबूचे अडथळे लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. वेळोवेळी सूचना देऊनही पाचही रस्त्याने लोकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे गावात होणारी गर्दी व येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाचही रस्ते बंद करून स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
वर्दळ कमी करण्यासाठी...
गावात बाहेरचे कोणतेही वाहन विचारपूस केल्याशिवाय येऊ दिले जात नाही. गावातून कोणतेही वाहन विचारपूस केल्याशिवाय बाहेर जाऊ दिले जात नाही. दवाखान्यात येणारे, भाजीपाला, औषधी, किराणा खरेदी करण्यासाठी येणारे, शेतमाल वाहतूक आदींना गावात प्रवेश मिळत असून, विनाकारण गावात प्रवेश करणाऱ्यांना बंदी आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाटणसावंगी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असल्याचे मयूर सातपैसे या स्वयंसेवकाने सांगितले.
--
गावात मूळ ग्रामस्थ, परप्रांतीय आणि नोकरदारांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र रहिवासी गांभीर्य समजून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते बंद करून वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
- रोशनी सुधीर ठाकरे, सरपंच