गटबाजीत अडकला गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:29+5:302021-02-05T04:37:29+5:30

नरखेड : नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह आठ सदस्य आहेत. परंतु यामध्ये चार-चारचे दोन गट पडले आहेत. सरपंचासह चार ...

Village development stuck in factionalism | गटबाजीत अडकला गावाचा विकास

गटबाजीत अडकला गावाचा विकास

Next

नरखेड : नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचासह आठ सदस्य आहेत. परंतु यामध्ये चार-चारचे दोन गट पडले आहेत. सरपंचासह चार सदस्य एकीकडे तर उपसरपंचासह चार सदस्य दुसरीकडे आहेत. सरपंचांनी केलेल्या खर्चावर उपसरपंच सही करीत नाही. उपसरपंच यांनी सुचविलेल्या कामांना सरपंच संमती देत नाही. त्यामुळे नाराज झालेल्या उपसरपंचांनी सरपंचाविरुद्ध गावातील विकास ठप्प असून निधी परत गेल्याची तक्रार पं.स. खंडविकास अधिकाऱ्यांकडे करीत २७ डिसेंबरपासून ग्रा.पं.ची मासिक सभा व कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या या धोरणामुळे गावाचे मात्र नुकसान होत आहे. उपसरपंच मारोती हिरामण लांडगे यांनी पं.स.चे खंडविकास अधिकारी यांंच्याकडे तक्रार दाखल करून सरपंच दर महिन्याला मासिक सभा घेऊन विचारलेल्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत नाही. ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सभेचे आयोजन करणे बंधनकारक असताना, कधीही महिला सभा घेतली नाही. घेतलेल्या एकाही प्रस्ताव, ठरावावर अंमलबजावणी करीत नाही. सभेव्यतिरिक्त कधीच ग्रामपंचायत कार्यालयात येत नाही. येथील ग्रामपंचायत कार्यकारिणी २० जुलै २०१९ पासून कार्यरत आहे. पण ग्रा.पं. अधिनियम ४९(९)नुसार ग्राम समित्या गठित करण्यात आल्या नाही. महिला व बालकल्याणचा १० टक्के खर्च केला नाही. १५ टक्के मागासवर्गीय खर्च केला नाही. चौदाव्या वित्त आयोग आराखड्यानुसार कामे झालेली नाही. सरपंच वंदना मधुकर टेकाम असताना त्यांचे पतीच कामकाजात ढवळाढवळ करतात, असे विविध आरोप करण्यात आले होते. खंडविकास अधिकाऱ्यांनी उपसरपंचांनी केलेल्या आरोपाची चौकशी करून जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. पण पुढे काहीएक झाले नाही.

- उपसरपंच मारोती हिरामण लांडगे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ काय कारवाई करतात, यावर सर्व अवलंबून आहे.

- प्रशांत मोहोड, खंडविकास अधिकारी, पं.स. नरखेड.

मला गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडून दिले आहे. गावातील विकासात्मक कामे नियमानुसार सुरू आहेत. त्यात गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य अडवणुकीचे धोरण स्वीकारून विकास कामात अडथळा निर्माण करीत असेल तर त्यांना गावकऱ्यांनीच समज देणे गरजेचे आहे.

-वंदना टेकाम

सरपंच, सिंगारखेडा.

Web Title: Village development stuck in factionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.