ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग हवा
By admin | Published: February 21, 2017 02:11 AM2017-02-21T02:11:03+5:302017-02-21T02:11:03+5:30
रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे.
सुधीर ठाकरे : पंचायत राज विभागातर्फे चर्चासत्र
नागपूर : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या सहभागानेच केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते, असे मत केंद्राच्या पंचायत राज विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले.
नाग विदर्भ चेंबर येथे आयोजित ‘ग्रामविकासाची भावी दिशा व उद्दिष्टे’ सुंदर, विकसित व परिपूर्ण गाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय नागपूर व अॅग्रोव्हेट-अॅग्रो.इंजि. मित्र परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक सुदूर संवेदना केंद्राचे मिलिंद वडोतकर, रोटरी क्लबचे मनीष भाटे, जनमंचचे प्रमोद पांडे, अमिताभ पावडे, रेड स्वास्तिकचे मिलिंद नाईक, नागपूर सेंद्रीय शेतीचे हरिसिंग चव्हाण, विकल्पा(ग्रामीण शिक्षण)चे सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या निर्मितीपासून ते आजपावेतो ग्रामविकासासाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामाबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास हा सूक्ष्म नियोजनाशिवाय आणि गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे हिवरा बाजारसारख्या विकसित गावांमुळे सिद्ध झाले आहे. अराजकीय व्यक्ती आणि प्रत्यक्ष कामातून घडवून आणलेला ग्राम विकासातील बदल होणे गरजेचे आहे. स्मार्ट व्हिलेज हे स्मार्टसिटीपेक्षा तितकेच महत्त्वाचे असून गावातील पैसा गावातच, सोबतच शहरातील पैसाही गावातच आणण्यावर भर देऊन कृषी विभागाची सिंचनक्षमता वाढविणे, कृषी उत्पादन आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळच बाजारपेठा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर ठाकरे यांनी केले. ग्रामीण जनतेवर विश्वास टाकून समाजाचा ग्रामविकासात सहभाग वाढवून जे काम स्थानिक पातळीवर होते, तेच काम ग्रामविकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे. तरच ग्रामविकास घडून येऊ शकतो. सेंद्रीय शेती, सिंचन, बाजारपेठा, नवनव्या उपग्रहाचा कृषी विकासासाठी वापर, जल आणि मृदासंधारण, साक्षरता, कृषी व कृषिपूरक उद्योग सुरू करणे, सीड व्हिलेज, खत आणि निविष्ठा, कडूनिंब प्रकल्प आदी विषयांवर उपस्थितांनी या चर्चासत्रात आपली मते मांडली. (प्रतिनिधी)