नाट्य संमेलनाच्या गावात : दलित नाट्य चळवळीचा झंझावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:44 AM2019-02-15T00:44:23+5:302019-02-15T00:46:29+5:30
मानव जातीच्या कल्याणाचा मूलमंत्र घेऊन तथागत बुद्धाच्या मार्गपथाचा प्रसार करण्यासाठी नाट्यकलेचा उपयोग करणारे भदंत अश्वघोष यांचा भारतीय रंगभूमीचे प्रथम नाटककार म्हणून उल्लेख केला जातो. बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन यानेही नाट्यकलेला राजाश्रय दिल्याचा उल्लेख सापडतो. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ या नाटकाद्वारे बहुजन नाट्यचळवळीच्या प्रवासाला मोठे बळ दिले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले आणि त्यातूनच दलित किंवा बहुजन नाट्यचळवळीचा झंझावात उभा राहिला. कदाचित कलेच्याही क्षेत्रात असलेल्या वर्गवारीमुळे ही स्वतंत्र नाट्यचळवळ उभी राहिल्याचे बोलले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानव जातीच्या कल्याणाचा मूलमंत्र घेऊन तथागत बुद्धाच्या मार्गपथाचा प्रसार करण्यासाठी नाट्यकलेचा उपयोग करणारे भदंत अश्वघोष यांचा भारतीय रंगभूमीचे प्रथम नाटककार म्हणून उल्लेख केला जातो. बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन यानेही नाट्यकलेला राजाश्रय दिल्याचा उल्लेख सापडतो. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ या नाटकाद्वारे बहुजन नाट्यचळवळीच्या प्रवासाला मोठे बळ दिले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले आणि त्यातूनच दलित किंवा बहुजन नाट्यचळवळीचा झंझावात उभा राहिला. कदाचित कलेच्याही क्षेत्रात असलेल्या वर्गवारीमुळे ही स्वतंत्र नाट्यचळवळ उभी राहिल्याचे बोलले जाते.
नागपुरातही दलित नाट्य चळवळीचा उदय हा नाट्यमयच म्हणावा लागेल. नाटकांच्या आधी तमाशा, दंडार, भारुड अशा वैशिष्ट्यपूर्ण लोककला बहुजन मनोरंजनाचे माध्यम होते. समानतेच्या जगण्यापासून वंचित असलेल्या समाजाला कलेच्या या प्रांतातूनही दूर सारले होते. मात्र जसजसे परिवर्तनाचे वारे वाहू लागले तसतसे या क्षेत्रात बहुजनांची मुशाफिरी वाढू लागली. १९०१ साली महाराष्ट्रात प्रथमच नागपूर येथे किसन फागुजी बनसोडे यांनी सन्मार्गबोधक अस्पृश्य समाज या संस्थेची स्थापना करून समाजप्रबोधनाच्या हेतूने रस्त्याच्या बाजूने चावडीवर नाट्यप्रयोग केल्याचा उल्लेख आहे. पुढे मात्र आंबेडकरी विचारांच्या प्रेरणेने वाङ्मयाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली असे म्हणायला हरकत नाही. १९६० नंतर दलित, विद्रोही साहित्याचा उदय होऊ लागला व यातून बहुजन समाजाच्या व्यथा महाराष्ट्रातील साहित्यात व्यक्त होऊ लागल्या. यातून नाट्यकलेलाही प्रोत्साहन मिळत गेले.
या काळात नागपूरच्या कलाक्षेत्रात दलित नाट्यलेखक म्हणून प्रभाकर दुपारे यांचा उदय झाला व त्यांनी १९७५ साली पँथर्स थिएटर ही संस्था स्थापन करून नाटकांची मालिका सादर केली. ‘अदृश्य नाटक’ हे मुक्त नाटकासह ‘सातासमुद्रापलिकडे, जयक्रांती उत्सव, झुंबर’ ही नाटके विशेष गाजली. त्यांच्या ‘रमाई’ या नाटकाचेही अनेक प्रयोग राज्यभर सादर झाले. यादरम्यान सुगंधाताई शेंडे यांच्या नाटिका तसेच कमलाकर डहाट यांच्या ‘मृत्युदिन वा मुक्तिदिन’ हे नाटकही चांगलेच गाजले. दलित रंगभूमीला मानाचे स्थान देण्यात लेखक-दिग्दर्शक संजय जीवने यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘मुक्तिवाहिनी, दलित रंगभूमी, अभिनव कलानिकेतन, प्रोग्रेसिव्ह थिएटर’ या नाट्यसंस्थांचेही योगदान उल्लेखनीय ठरते. अजिंक्य सुटे, शुभम लुटे,रितीक अमाळकर, प्रतीक खोब्रागडे, जुहील उके, सांची तेलंग, आशिष दुर्गे, करुणा नाईक, प्रज्ञा गणवीर, कमल वाघधरे, तक्षशीला वाघधरे, पल्लवी वाहाने, दादाकांत धनविजय, सारनाथ रामटेके, प्रीतम बुलकुंडे, रोशन सोमकुंवर, डॉ. निलकांत कुलसंगे, डॉ. सतीश पावडे, डॉ. सुनील रामटेके, जावेद कुरैशी अशा लेखक, दिग्दर्शक व नाट्यकलावंतांनी दलित रंगभूमीच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे.
गणवीरांच्या बहुजन रंगभूमीची वाटचाल
साधारणत: १९९० नंतर उदय झाला तो वीरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीचा. अभिनेता, नाट्यलेखक व दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी गेल्या ३० वर्षापासून बहुजनांची रंगभूमी यशस्वीपणे विदर्भात उभी केली आहे. ‘निर्दोष बालकाची हत्या’ या नाटकाचे वस्त्यावस्त्यात प्रयोग झाले व येथून त्यांच्या बहुजन रंगभूमीची वाटचाल सुरू झाली. ७० पेक्षा जास्त बालनाट्य, एकांकिकांचे लेखन गणवीर यांनी केले आहे. बालनाट्य, पथनाट्य, जलसा, एकांकिका व महानाट्याचे मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये १००० पेक्षा अधिक प्रयोग त्यांनी देशभरात केले आहेत. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसह विविध नाट्य स्पर्धा आणि संस्थांचे शेकडो पुरस्कार वीरेंद्र गणवीर, त्यांची नाटके व त्यातील कलावंतांनी प्राप्त केले हे विशेष. ‘घायाळ पाखरा, दि लास्ट ह्युमन्स, हिटलर की आधी मौत, उजळल्या साऱ्या नव्या दिशा, रिमांड होम, बटालियन १८१८, मै फिर लौट आउंगा, बदसुरत, भारत अभी बाकी है, नग रं बाबा शाळा’ या त्यांच्या काही गाजलेल्या नाट्यकृती होत. बहुजन रंगभूमीद्वारे नुकतीच निर्मिती असलेल्या ‘गटार’ या नाटकालाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या संस्थेच्या नाटकातून गणवीर यांनी अनेक तरुण कलावंत घडविले असून त्यांच्या काही कलावंतांनी चित्रपट, मालिका व विदेशी रंगभूमीवर आपली ओळख निर्माणकेली आहे. सुरेंद्र वानखेडे, अमित गणवीर, श्रेयश अतकर, अतुल सोमकुंवर, अस्मिता पाटील, प्रियंका तायडे, तृषांत इंगळे, स्नेहलता तागडे या नाट्यकर्मींचाही उल्लेख येथे करावा लागेल. गेल्या ३० वर्षाच्या अथक परिश्रमाने वीरेंद्र गणवीर यांनी बहुजन रंगभूमी केवळ उभी केली नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी रंगभूमीची दिशा दाखविण्याचे कार्य केले आहे.