मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन

By आनंद डेकाटे | Published: January 4, 2024 05:52 PM2024-01-04T17:52:33+5:302024-01-04T17:55:25+5:30

विजयलक्ष्मी बिदरी: १०० कुटुंबासाठी राहणार एक प्रगणक

Village wise micro planning for survey of Maratha community and open category citizens | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरिता सर्व जिल्ह्यांनी सर्वेक्षण करावयाची कुटुंबे, सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविणे आदींबाबत गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांना दिले.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबाबत करावयाची कार्यवाही व तयारीविषयी बिदरी यांनी विभागातील सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी आयुक्त कार्यालयात नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील उपस्थित होते.

या सर्वेक्षणाकरिता पुणे येथील गोखले इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक्स आणि मुंबई येथील आयआयपीएस संस्थेद्वारे स्वॉफ्टवेयर अप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. याद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणासाठी गावनिहाय नियोजन करण्यात यावे. या कामी ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, कृषी सेवक, पोलीस पाटील, शिक्षक आदींची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात यावी आणि तशी माहिती आयोगाला तातडीने देण्याचे निर्देश बिदरी यांनी दिले. १०० कुटुंबासाठी एक प्रगणक आणि या प्रगणकांवर निरिक्षणासाठी एक निरीक्षक याप्रमाणे नियोजन करावे. प्रगणकांना प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

या सर्वेक्षणादरम्यान प्रगणकांद्वारे मोबाईलवर स्वॉफ्टवेयर अप्लीकेशनमध्ये माहिती भरण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १५० प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. प्रगणकांना आयोगातर्फे युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे, या कामासाठी मानधनही देण्यात येणार आहे. स्थानिक शासकीय यंत्रणा व जिल्हा परिषदेमार्फत प्रगणक व निरीक्षक पुरवण्या संदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घेऊन पोलीस प्रशासनाने आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याच्यादृष्टिने नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.जिल्ह्यांसह विभागात नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांमध्येही हे सर्वेक्षण होणार आहे.

असे आहेत विभागातील समन्वयक अधिकारी

  • विजयलक्ष्मी बिदरी (विभागीय आयुक्त) : विभागीय समन्यवयक अधिकारी
  • प्रदीप कुलकर्णी (सामान्य प्रशासन उपायुक्त) : सहाय्यक विभागीय समन्वयक अधिकारी
  • चंद्रभान पराते (करमणूक कर उपायुक्त) : नागपूर
  • विवेक इलमे (विकास आस्थापना उपायुक्त) : भंडारा
  • अनिल बन्सोड(पुरवठा उपायुक्त) : गोंदिया
  • धनंजय सुटे (नियोजन उपायुक्त) : चंद्रपूर
  • कमलकिशोर फुटाणे (विकास उपायुक्त) : गडचिरोली
  • दिपाली मोतीयेळे (प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी) : वर्धा

Web Title: Village wise micro planning for survey of Maratha community and open category citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर