कोरोनाच्या दहशतीमुळे गावकरी टाळताहेत कृषी अधिकाऱ्यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:06 AM2020-04-26T11:06:14+5:302020-04-26T11:06:40+5:30
नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे बहुतेक गावकरी नागपूरकरांशी संपर्क टाळत आहेत. त्याचा फटका कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीला बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे बहुतेक गावकरी
नागपूरकरांशी संपर्क टाळत आहेत. त्याचा फटका कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीला बसत आहे. परिणामत: ऐन खरीपाच्या तोंडावरच या तयारीला ब्रेक लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.
नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. माध्यमांमधून ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचत असून, ते स्वत:ला अधिकाधिक जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच खरीपाच्या नियोजनाची बैठक झाली. त्या नियोजनानुसार कृषी अधिकारी गावकऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गावकरी त्यांच्या भेटी टाळत असल्याचे चित्र आहे. या काळामध्ये गावकरी अधिक दक्ष झाले आहेत. बाहेरून वाहनांद्वारे कुणी येऊ नये यासाठी काही गावकऱ्यांनी गावांमध्ये येणारे मार्ग बंद करून ठेवले आहेत. अनेक गावांमध्ये दक्षता समित्या स्थापन करून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जात आहे.
सध्याचा काळ खरीप पूर्वतयारीचा आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण करून ठेवली आहे. मात्र कोरोनामुळे कार्यालयातील उपस्थितीवर परिणाम पडला आहे. शासनाच्या आदेशानुसार कार्यालयांमध्ये ५ ते १० टक्के उपस्थिती असल्याने फिल्डवर पोहचणे अशक्य होत आहे. वाहतुकीच्या साधनांचीही अडचण आहे. परिणामत: खरीपाच्या पूर्वतयारीसाठी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे अडचणीचे ठरत आहे.
ग्रामस्तरीय कमिट्यांना योजनांची लिंक
तोंडावर आलेल्या खरीपाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी योजनांच्या माहितीची लिंक ग्रामस्तरीय कमिट्यांना पाठविणे सुरू केले आहे. त्या माध्यमातून कमिट्यांमधील सदस्यांनी गावकऱ्यांना योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र त्यातही काही गावांमध्ये नेटवर्कच्या तांत्रिक अडचणी आहेत तर काही ठिकाणी ही तांत्रिक माहिती गावकºयांना पटवून सांगण्यात सदस्य कमी पडत आहेत.
...