ग्रामस्थांनी फेटाळला अविश्वास प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:28+5:302021-02-05T04:39:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेसूर : स्थानिक सरपंच व उपसरपंच याच्या अंतर्गत वादामुळे गावातील विविध विकासकामे रखडली आहेत. त्यातच ग्रामपंचायत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेसूर : स्थानिक सरपंच व उपसरपंच याच्या अंतर्गत वादामुळे गावातील विविध विकासकामे रखडली आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचाविराेधात अविश्वास प्रस्ताव घेत पारित केला. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आयाेजित करून याच अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यात प्रस्तावाच्या बाजूने १४९, तर विराेधात ५११ ग्रामस्थांनी मतदान केल्याने हा प्रस्ताव ३६२ मतांनी फेटाळण्यात आला.
बेसूर (ता. भिवापूर) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तीन वर्षे सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या काळात गावात काेणतीही विकासकामे करण्यात आली नाहीत. याला सरपंच स्नेहा चावट व उपसरपंच भय्याजी गिरडे यांच्यातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे ठरवित उपसरपंच भय्याजी गिरडे यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव घेतला आणि ताे पारितही करण्यात आला. त्यामुळे भय्याजी गिरडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे दाद मागितली.
त्याअनुषंगाने गुरुवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयाेजन करण्यात आले. यात अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात येणार असल्याची सूचनाही मतदारांना आधी देण्यात आली हाेती. तशी व्यवस्थाही प्रशासनाने केली हाेती. गावातील एकूण १,८१५ मतदारांपैकी ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६६० मते वैध, तर ६७ मते अवैध ठरविण्यात आली. वैध मतांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने १४९, तर विराेधात ५११ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव ३६२ मतांनी फेटाळण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी मतमाेजणीनंतर जाहीर केले.
....
उपसरपंचावरील आराेप
हा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी नाकारलेले भय्याजी गिरडे यांचे उपसरपंचपद ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा बहाल केले. अविश्वास ठराव घेताना त्यांच्या विराेधात कामात अथळा निर्माण करणे, ठरावाना विराेध करणे, ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांशी अर्वाच्य भाषेत बाेलणे यासह एकूण २० आराेपांचा ठपका ठेण्यात आला हाेता. या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपणावरून ग्रामस्थांना करण्यात आले हाेते. मात्र, बहुतांश ग्रामस्थांनी ठरावाच्या विराेधात मतदान केले.