ग्रामीण लोक म्हणतात, मेयो-मेडिकलमध्ये नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:28+5:302021-04-01T04:07:28+5:30
नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव ...
नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव आहे की मेयो, मेडिकलमधून रुग्ण परत न येता त्याची राखच येते. या दहशतीपोटी ग्रामीण भागात टेस्टिंगचे प्रमाण कमी झाले आहे. २९ मार्चच्या अहवालानुसार ग्रामीण भागात १९३८ टेस्ट झाल्या आणि पॉझिटिव्ह ९५५ आले. त्यात २० बाधितांचा मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील पॉझिटिव्हचा दर ५० टक्क्याच्या जवळपास आहे.
गेल्या दहा दिवसातील ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह व मृत्यूचा आढावा घेतला असता तो दररोज वाढत आहे. शहरामध्ये दहा हजार टेस्ट झाल्यास पॉझिटिव्हची संख्या दोन हजाराच्या जवळपास असते. पण ग्रामीणमध्ये दोन हजार टेस्ट झाल्या तरी ८०० ते ९०० पॉझिटिव्ह येत आहेत. २१ मार्चपासून मृत्यूची संख्या दोन आकड्यावर पोहचली आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या पदार्पणात जी धास्ती, सतर्कता जिल्ह्यातील गावकऱ्यांनी बाळगली होती ती आता नाहीशीच झाल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणासुद्धा ग्रामीण भागात व्हिटॅमिनच्या गोळ्यावर कोरोनाशी लढत आहे. लोक ऐकायला तयार नाही, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारी टेस्टिंग रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, तो कसा चुकीचा आहे, हे दाखविण्यासाठी खासगी लॅबमध्ये पुन्हा टेस्टिंग केले जात आहे. यादरम्यान गावभर फिरणारी ती व्यक्ती अनेकांना संक्रमित करीत आहे.
- व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर सुरू आहे लढाई
आरोग्य यंत्रणा कोरोनाची लढाई केवळ व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर लढत आहे. तालुका रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद आहे. रेडिओलॉजिस्ट नाही. सिटीस्कॅनची सोय नाही. रेमडिसीव्हर, टॅमिफ्लू, फॅबिफ्लू यासारख्या औषधी ग्रामीण भागात मिळत नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर होत आहे. मेडिकल, मेयोशिवाय पर्याय नाही.
- ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे की, टेस्टिंग केल्यावर पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल, मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. तिथे गेलेला रुग्ण परत येत नाही, त्याची राखच येते. त्यामुळे टेस्टिंग न करता घरच्याघरी उपचार लोक करीत आहेत. गावागावात मेयो, मेडिकलच्या बाबतीत दहशत निर्माण झाली आहे. घरी मरू पण मेडिकलमध्ये जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांची आहे.
संजय झाडे, जि.प. सदस्य
- ग्रामपंचायतीमध्ये फक्त शासकीय कर्मचारीच काम करीत आहेत. पोलीस पाटील तर घरूनच टपल्या मारते. लीडर फक्त लीडरकी करीत आहे. लोकांना नियम सांगायला गेलो तर दोन गोष्टी आम्हालाच ऐकाव्या लागतात. कुणाला हटकले तर आम्हाला लाथाबुक्क्या खाव्या लागतात. सरकारी कर्मचाऱ्याला ग्रामीणस्तरावर प्रोटेक्शनच नाही.
हरिदास रानडे, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना
- सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते
लोक सहभाग देत नाहीत, मास्क लावत नाहीत. घर सील करावे तर घराबाहेर पडतात. ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांचे कुणी ऐकत नाही. पोलीस पाटील साथ देत नाहीत, सरपंच मतलबी, सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते, अशी व्यथा ग्रामसेवकांनी व्यक्त केली.