नागपूर जिल्ह्यात ग्रामस्थांनी पकडले धान्य, स्वस्त धान्य दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:29 PM2018-08-06T23:29:59+5:302018-08-06T23:31:50+5:30
कळमेश्वर तालुक्यातील भडांगी येथील परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थ्यांना न वितरित करता ते बाजारात विकण्याचा प्रकार वाढल्याने खुद्द ग्रामस्थांनी पुढाकार घेत धान्य पकडले आणि तहसीलदारांना सूचना दिली. त्यामुळे नायब तहसीलदारांनी गावात जाऊन या प्रकाराची चौकशी केली आणि तहसीलदारांच्या आदेशान्वये ते दुकान सील केले. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील भडांगी येथील परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थ्यांना न वितरित करता ते बाजारात विकण्याचा प्रकार वाढल्याने खुद्द ग्रामस्थांनी पुढाकार घेत धान्य पकडले आणि तहसीलदारांना सूचना दिली. त्यामुळे नायब तहसीलदारांनी गावात जाऊन या प्रकाराची चौकशी केली आणि तहसीलदारांच्या आदेशान्वये ते दुकान सील केले. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली.
लक्ष्मण दाढे, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर हे भडांगी (ता. कळमेश्वर) येथील सरकारी स्वस्त धान्याचे दुकान (परवानाधारक) चालवितात. ते मागील काही दिवसांपासून रेशनचे धान्य लाभार्थ्यांना व्यवस्थित वितरित करीत नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काहींनी या प्रकाराच्या पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, फारसा उपयोग झाला नाही.
दरम्यान, लक्ष्मण दाढे हे रविवारी सायंकाळी स्वस्त धान्य दुकानातील धान्य पोत्यात भरून ते बैलगाडीने नेत असल्याचे काहींना आढळून आले. शांताराम पसारे हे बैलगाडी हाकलत होते. पसारे यांनी दाढे यांची शेती ठेक्याने केल्याने त्यांची जवळीक आहे. या प्रकाराबाबत नागरिकांनी स्थानिक कोतवाल भीमराव शेंडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच तहसीलदार हंसा मोहने आणि नायब तहसीलदार (पुरवठा) संजय भुजाडे यांना माहिती दिली.
दुसरीकडे, भुजाडे यांनी भडांगी गाठले आणि शांताराम पसारे यांच्या शेतातील बैलगाडी व टिनाच्या शेडची पाहणी केली. त्या शेडमध्ये गव्हाचे प्रति ५० किलो वजनाचे १२ पोती, तांदळाची तीन पोती आढळून आली. धान्याची ही पोती रासायनिक खतांच्या पोत्यांमध्ये दडवून ठवली होती. शिवाय, ती ताडपत्रीने झाकली होती. त्यामुळे हा धान्य साठा जप्त करीत अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानाला सील ठोकले. यावेळी पुरवठा विभागाच्या निरीक्षक वैशाली माळी, तलाठी सुरतकर, कोतवाल भीमराव शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.