पाण्यासाठी ग्रामस्थांचा नागपूर जि.प.मध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:46 AM2019-06-08T00:46:18+5:302019-06-08T00:48:21+5:30
काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात धडकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात धडकले.
काटोल तालुक्यातील मेंढेपठार (बाजार) येथील शेकडो ग्रामस्थांनी देशकर पवार यांच्या नेतृत्वात जि.प.मुख्यालय गाठले. येथे प्रशासनाविरोधात नारे निदर्शने करुन मडकी फोडून आपला रोष व्यक्त केला. ग्रामस्थांचे म्हणने होते की जि.प.माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी मेंढेपठार या गावामध्ये आपल्या स्वत:च्या शेतातील विहिरीचे पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण केले आहे. विहिरीला पाणी असताना देखील ते एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. तसेच पाणी अधिग्रहण नियमानुसार पूर्णत: पिण्याचे पाणी देत नाही. ४-५ दिवसाआडही कधी कधी पाणी पुरवठा करतात. हे सर्व ते सूडबुध्दीने स्वत:च्या शेताचे ओलित केल्याशिवाय गावाला पाणी देत नाही. राजकीय रागापोटी ते गावातील नागरिकांना वेठीस धरीत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांच्याकडे सादर केले. सावरकर यांनी ग्रामस्थांचे ऐकून घेत तात्काळ गावामध्ये दोन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व काटोल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आंदोलनात देशकर पवार यांच्यासह अरुण शिरपूरकर, तुकाराम लोणारे, प्रमोद कोहळे, रत्ना क्षीरसागर, रंजना सरियाम, मनोज जामडे व शेकडो ग्रामस्थ होते.
गावात पाणीटंचाई नाहीच - सरपंच चिखले
गावात पाण्याची समस्या नाहीच काही विरोधक तसा खोटा आव आणत आहे. मागील तीन महिन्यापासून चंद्रशेखर चिखले यांच्या स्वत:च्या खासगी विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करतअसुन गावाची लोकसंख्या ९७० असून ३० हजार लिटर पाण्याची टाकी दररोज भरून पाणी दिले जाते. काही विरोधक जाणीवपूर्वक टंचाई असल्याचा भास निर्माण करीत असून राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मेंढेपठारच्या सरपंच दुर्गा चिखले यांनी सांगितले.