संविधान चौकात आंदोलनस्थळीच ग्रामस्थांनी केला मुलीचा साक्षगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 08:54 PM2023-05-03T20:54:46+5:302023-05-03T20:55:09+5:30
Nagpur News अतिक्रमण कारवाईत घर उद्ध्वस्त झाल्यामुळे पुनर्वसनात घर मिळावे, या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा येथील ग्रामस्थ संविधान चौकात आंदोलन करत आहेत. या ग्रामस्थांपैकी एका कुटुंबातील मुलीचे साक्षगंध ग्रामस्थांनी आंदोलनस्थळीच आटोपून घेत शासनाचा निषेध केला.
नागपूर : अतिक्रमण कारवाईत घर उद्ध्वस्त झाल्यामुळे पुनर्वसनात घर मिळावे, या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा येथील ग्रामस्थ संविधान चौकात आंदोलन करत आहेत. या ग्रामस्थांपैकी एका कुटुंबातील मुलीचे साक्षगंध ग्रामस्थांनी आंदोलनस्थळीच आटोपून घेत शासनाचा निषेध केला.
हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा येथे काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यात अनेक घरे पाडण्यात आली. दरम्यान, न्यायालयातून स्थगिती आणल्याने या कारवाईत ११५ घरे वाचली तर उर्वरित घरांवर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली. या कारवाईतील विस्थापितांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेच्या नेतृत्वात पीडित ग्रामस्थ ८ दिवसांपासून संविधान चौकात आंदोलनाला बसले आहेत. सातगाव वेणा येथे ज्या दिवशी अतिक्रमण कारवाई करण्यात आली, त्या दिवशी गावातील सपना नावाच्या मुलीचे साक्षगंध होते. परंतु, कारवाईमुळे साक्षगंध पुढे ढकलण्यात आले. अखेर पुनर्वसन न झाल्याने वर मंडळींनी साक्षगंध उरकून घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार संविधान चौकात साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला.
- अतिक्रमणाच्या नावाखाली या कुटुंबियांचे घर तोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नागपूरचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे. शहरात सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत डोक्यावरील छत राहिले नसल्याने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
- निहाल पांडे, आंदोलक