रामभाऊंच्या ‘विमलाश्रम’ला हवाय समाजाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:04 AM2019-05-13T10:04:00+5:302019-05-13T10:06:48+5:30
कुठलेही शासकीय अनुदान न घेता रामभाऊंनी उभे केलेले ‘विमलाश्रम’ या मुलांचे आधारवड झाले आहे. मात्र, हे सर्व करताना, या मुलांच्या दैनंदिन तसेच शालेय व वैद्यकीय गरजा पूर्ण करताना रामभाऊंवर कर्जाचा डोंगर चढला आहे.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंचितांचे दु:ख, वेदना आपल्या मानून त्यांना माया लावणारी काही थोडी माणसे असतात. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...’, तुकोबांनी दिलेली सत्पुरुषाची ही अचूक ओळख. ही ओळख सार्थ ठरविणारे एक नाव म्हणजे रामभाऊ इंगोले. रामभाऊंनी समाजाकडून तिरस्कार, अवहेलनेशिवाय काहीच न मिळालेल्या वस्तीतील मुलांना त्यांनी पदरात घेतले. नुसतीच माया दिली नाही तर त्यांना समाजाचा जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी परिश्रम घेतले. कुठलेही शासकीय अनुदान न घेता रामभाऊंनी उभे केलेले ‘विमलाश्रम’ या मुलांचे आधारवड झाले आहे. मात्र, हे सर्व करताना, या मुलांच्या दैनंदिन तसेच शालेय व वैद्यकीय गरजा पूर्ण करताना रामभाऊंवर कर्जाचा डोंगर चढला आहे. सेवेचा हा वसा जपण्यासाठी त्यांना समाजातील संवेदनशील दानदात्यांकडून मदतीची गरज आहे.
रामभाऊंच्या या कार्याची सुरुवातही नाटकीयच म्हणावी लागेल. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आंदोलनासाठी त्या वस्तीत गेलेल्या रामभाऊंना येथील मुलांच्या वेदनादायी दिशाहिन बालपणाची जाणीव झाली आणि आपण या मुलांसाठी कार्य करावे हा निर्णय त्याचक्षणी घेतला. सुरुवातीला या मुलांना त्यांनी अमरावती, नाशिकच्या बालगृहात टाकले. पण या मुलांना तेथेही अवहेलना सहन करावी लागली. शेवटी चार मुलांना घेऊन ते घरी आले. अर्थातच यात त्यांना टोकाचा विरोधही पत्करावा लागला. पहिला विरोध तर घरातूनच सुरू झाला व त्यांना घरही सोडावे लागले. समाजाने त्यांना वाळीत टाकले, ते वेगळेच. पण हा टोकाचा विरोध सोसताना रामभाऊ डगमगले नाहीत की घेतलेला समाजसेवेचा वसा सोडला नाही. कारण समाजाच्या विरोधापेक्षा बहिष्कृत मुलांसाठी त्यांच्या मनात असलेली संवेदना अधिक बळकट होती. यामध्ये काही संवेदनशील मित्रांचे सहकार्य त्यांना मिळाले, ही बाब त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कारक ठरली. घरातून बाहेर पडल्यानंतर भाड्याच्या घरात त्यांनी कार्य सुरू केले आणि अनेक मित्र, दानदाते यांच्या सहकार्यातून ‘विमलाश्रम’ उभे झाले. हा प्रवास अनेक हालअपेष्टा, संघर्ष आणि असंख्य कटु अनुभवांनी भरलेला आहे, हे येथे वेगळे सांगायला नको. त्यांचे हे कार्य गेल्या २० ते २२ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. या काळात त्यांच्या विमलाश्रमात वाढलेल्या नऊ मुलींचे थाटात लग्न केले. आठ मुलांनी लहानमोठे व्यवसाय थाटले तर येथून शिकून गेलेली २० ते २२ मुले वेगवेगळ््या ठिकाणी नोकरी करीत आहेत. विमलाश्रमात आताही ३ मुले व २५ मुली असे २८ मुलामुलींचे वास्तव्य असून त्यातील काही पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या निव्वळ राहण्या व शिक्षणाचीच व्यवस्था रामभाऊ यांनी केली नाही तर संवेदनशीलता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ््या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाशी जोडून घेतले. कधी गरीब वस्त्यातील मुलांना कपडे वाटप, मंदिरासमोर बसलेल्या उपाशी माणसांना अन्न वाटप तर कामगारांच्या मुलांना शिकविण्याचे काम या मुलांच्या माध्यमातून त्यांनी केले. याच उपक्रमातून विमलाश्रमाच्या कार्याचा विस्तार झाला. उमरेड रोडवरील पाचगावमध्ये दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी दर रविवारी झाडाखाली शाळा भरविण्याचे काम विमलाश्रमातील मुलांनी चालविले आणि आज या कार्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. याच झाडाखाली मोठी शाळा उभी झाली असून आजच्या घडीला १३३ मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था येथे निर्माण झाली आहे. अशाप्रकारे रामभाऊंच्या विमलाश्रमाचे कार्य विस्तारत गेले. मात्र कार्य विस्तारत गेले तसे त्यांच्यासमोरच्या अडचणीही वाढत गेल्या. समाजाच्या कुचंबणेपुढे रामभाऊ कधी झुकले नाहीत. पण सर्व काळ सारखा नसतो. पाच जीवांचे कुटुंब सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर हे कु टुंब सांभाळणाºया रामभाऊ यांना काय अडचणी येत असतील याचा विचार करा. रामभाऊ यांच्या शब्दात, सहकार्य करणाऱ्यांच्या पाठबळामुळे सुरू असलेले कार्य अधिक व्यापक करण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यातून निर्माण होणाºया आर्थिक गरजा वाढत गेल्या. याशिवाय पाचगावच्या शाळेतील शिक्षकांचे, इतर कर्मचाºयांचे तसेच विमलाश्रमातील कर्मचाºयांचे पगार, मुलांना ने-आण करणाºया वाहनांचा खर्चही वाढला आहे. निव्वळ पेट्रोल पंपाचे थकीत बिल ८० हजारावर गेल्याचे त्यांनी सांगितले. विमलाश्रमात राहत असले तरी या मुलांच्या भावनिक गरजांकडे रामभाऊ यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. यातील काही मुले मोठ्या शाळेत शिक्षण घेत आहेत. इतर मुलांप्रमाणे त्यांना आवश्यक सोईसुविधांची त्यांनी सतत काळजी घेतली. मुलांची ट्यूशन, संगीत, नृत्याचे क्लासेस, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी जे-जे आवश्यक आहे, ते पूर्ण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. विमलाश्रमातील मुले कुठल्याही बाबतीत वंचित राहू नये, ही त्यामागची भावना. पाचगावच्या निवासी शाळेत निवास आणि शिक्षण एकाच इमारतीत आहे. त्यामुळे या मुलांच्या निवासासाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे, असा त्यांचा मानस आहे. यासोबत या मुलांना कौटुंबिक वातावरण मिळावे म्हणून या परिसरात ज्येष्ठ नागरिकांचे निवासकेंद्र उभे राहावे, हेही स्वप्न आहे. विमलाश्रमाच्या काही खोल्या अर्धवट बांधकाम झाल्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्या, अशी अपेक्षा त्यांना आहे. रामभाऊ यांनी वैयक्तिक कुणाकडूनही काही मागितले नाही तरी हे सेवाकार्य दानदात्यांच्या भरवशावर उभे आहे व भविष्यातही चालावे, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे समाजाने त्यांच्या कार्याविषयी संवेदना जागवणे गरजेचे आहे. वंचितांच्या वेदनांशी जुळलेले हे कार्य असेच अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी दानदात्यांकडून मदतीची अपेक्षा आहे.
अशी करता येईल मदत
पत्ता : विमलाश्रम, ५९, उदयनगर एनआयटी गार्डन समोर, नागपूर. मोबाईल क्रमांक : ८६६९३२९६६२
धनादेश किंवा मदत जमा करण्यासाठी बँकेचे खाते
आम्रपाली उत्कर्ष संघ,
बँक ऑफ महाराष्ट्र, अयोध्यानगर शाखा
शारदा चौक, अयोध्यानगर.
खाते क्रमांक : २००८९०२२७९४
आयएफएससी कोड : एमएएच बी ००००९४७