विनोद शिवकुमार यांनी जामीन अर्ज मागे घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:30+5:302021-06-11T04:07:30+5:30
नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यामुळे प्रकरणातील मुख्य आरोपी गुगामल ...
नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यामुळे प्रकरणातील मुख्य आरोपी गुगामल वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जामीन अर्ज मागे घेतला. ते आता अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्यांना उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
प्रकरणावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप आहे. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी हेदेखील आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे. शिवकुमारतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.