खुलेआम जमावबंदीचे उल्लंघन, पोलीस कारवाई थंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:04+5:302021-04-09T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक होत असल्यामुळे उपराजधानीतदेखील जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक होत असल्यामुळे उपराजधानीतदेखील जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु जागोजागी याचे उल्लंघन होत असतानादेखील पोलिसांकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. पोलीसांच्या उदासिनतेमुळे स्प्रेडर्स खुलेआमपणे नियमांचा भंग करताना दिसून येत आहेत.
धोका रोज वाढत असतानाही बेजबाबदार मंडळी त्यापासून धडा घ्यायला तयार नाही. नेहमीप्रमाणेच रस्त्यावर गर्दी दिसत आहे. त्यात बेशिस्तीचाही कळस आहे. बरेच जण अजूनही साधा मास्क तोंडावर लावायला तयार नाही. पोलिसांकडून अशा लोकांवर कडक कारवाई अपेक्षित आहे. मात्र शहरातील काही चौक सोडले तर इतर ठिकाणी बंदोबस्तच दिसून येत नाही. रात्रीदेखील अनेक ठिकाणी तरुण विनाकारण फिरत असूनदेखील कुठलीही कारवाई होत नाही. पोलीस कारवाई करत नसल्याने बेजबाबदार लोकांवर कुठलाही वचक राहिलेला नाही.
पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली तर अंगावर धावून जाण्याचे, विरोध करण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे पोलीस कारवाईऐवजी समुपदेशनाच्या पवित्र्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी जनतेला कोरोनापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासोबतच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांचा वाहनांवरून रूट मार्च
जनजागरणासाठी पोलिसांनी गुरुवारी शहरातील पाचही झोनमध्ये वाहनांवरून रुट मार्च केला. सायंकाळी ५ वाजतापासून सीताबर्डीच्या व्हेरायटी चाैकातून मार्चला सुरुवात झाली. त्या त्या भागातील पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात शहरात मार्च काढण्यात आला. सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, गोकूळपेठ, सदर, सिव्हिल लाइन, रवीनगर, अंबाझरी भागात पोलिसांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले.