नागपुरात नियमांचे उल्लंघन, ६०८० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:44 PM2020-07-22T21:44:16+5:302020-07-22T21:45:25+5:30
शहरात कोविड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६,०८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून २८ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोविड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६,०८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून २८ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे अशा बाबींसंदर्भात मनपाने ५ जून ते २१ जुलैदरम्यान करवाई करून हा दंड वसूल केला.
‘मिशन बिगीन’अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाजारांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी दुकानांसाठी नियमावली तयार केली. यात सम व विषम तारखानुसारच दुकाने सुरू करण्याची तरतूद आहे. तसेच घराबाहेर फिरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपातर्फे देण्यात आले आहेत. नियमांचे पालन केले जावे यासाठी महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: शहरातील विविध भागात फिरून जनजागृतीही करीत आहेत. उपद्रव शोध पथकाद्वारे सर्व झोनमध्ये धडक कारवाई केली जात आहे. मास्क न लावणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. ५ जून ते २१ जुलैदरम्यान मास्क न लावणाºया ४,६०१ जणांवर कारवाई करून २०० रुपये दंड याप्रमाणे ९ लाख २० हजार २०० रुपये वसूल करण्यात आलेला आहे.
बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरुवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १८ जुलैदरम्यान १३८० दुकानदारांकडून १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नवीन आदेशानुसार सम व विषम तारखांच्या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ८ हजार रुपये व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार दंड वसूल करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार १८ ते २१ जुलैदरम्यान ८० दुकानांवर पहिल्यांदा नियमभंगाची कारवाई करून ५ हजार, याप्रमाणे एकूण ४ लाख दंड वसूल करण्यात आला. तर तिसऱ्यांदा नियम तोडणाऱ्या १९ दुकानांवर कारवाई करीत १० हजार असा १ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असा एकूण एकूण १९ लाख ७० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
मंगळवारी १५४ जणांवर कारवाई
मंगळवारी महापौर व आयुक्तांनी जनजागृती दौऱ्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली. मास्क न वापरणारे आणि सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३ लाख २ हजार २०० रुपये, मास्क न वापरणाऱ्या १११ जणांकडून २२ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ४३ दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली. दोन लाख ८० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.