नागपुरातील खासगी रुग्णालयात नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:30 PM2020-08-12T22:30:54+5:302020-08-12T22:32:16+5:30
कोविड-१९ आजाराच्या उपचारासह इतर आजारांच्या उपचाराचे दर राज्य शासनाने निर्धारित केले आहेत. मात्र शहरातील बहुतेक रुग्णालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोविड उपचाराबाबत अधिकृत परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयातही नियमांचे उल्लंघन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ आजाराच्या उपचारासह इतर आजारांच्या उपचाराचे दर राज्य शासनाने निर्धारित केले आहेत. मात्र शहरातील बहुतेक रुग्णालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोविड उपचाराबाबत अधिकृत परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयातही नियमांचे उल्लंघन होत आहे. रुग्णांकडून वाजवीपेक्षा अधिक दर वसूल करण्याच्या प्रकरणात सेवन स्टार रुग्णालय व वोक्हार्ट रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाय खासगी रुग्णालयांवर लक्ष असल्याचेही मनपाने वारंवार सांगितले आहे. असे असूनही नियमांचे पालन करण्यात रुग्णालये टाळाटाळ करीत आहेत.
मनपाच्या विशेष पथकाने संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली तेव्हा त्यांच्या दर्शनी भागात असे कुठलेही दरपत्रक लावलेले आढळून आले नाही. दोन्ही रुग्णालयांना रुग्णांकडून अधिकचे शुल्क वसुलणे व नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांना रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क तात्काळ परत करण्याचे निर्देश मनपाकडून देण्यात आले. जाणकारांच्या मते सध्या महापालिकेद्वारे कोविड रुग्णांचा उपचार करणाऱ्या अधिकृत रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. मात्र उर्वरित रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट केली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच रुग्णालयांना नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईस तयार रहा, असा इशारा दिला आहे.
रद्द होऊ शकतो परवाना
रुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात महामारी कायदा, आपत्ती निवारण कायदा, मुंबई नर्सिंग अॅक्ट आदी कायद्यांच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अधिक मनमानी केल्यास रुग्णालयांचा परवानाच रद्द केला जाऊ शकतो.
हे आहेत नियम
- खासगी रुग्णालये ८० टक्के बेडवर सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क वसूल करू शकतील. उर्वरीत २० टक्के बेडवर रुग्णालये स्वत:चा दर लावू शकतील.
- कोविड रुग्णांचा उपचार प्रशासनाने नेमलेल्या रुग्णालयातच केला जाईल. जेवढे बेड निर्धारित करण्यात आले, त्यापैकी ८० टक्के बेडवर सरकारी दराने उपचार करणे बंधनकारक असेल.
- रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. शिवाय दाखल रुग्णांची माहिती देणेही आवश्यक आहे.
- नियमानुसार मनपा प्रशासनाने नियुक्त केलेले पथक कधीही रुग्णालयांचे आकस्मिक निरीक्षण करू शकतील.
- अतिरिक्त शुल्क वसूल केल्याची तक्रार रुग्ण किंवा नातेवाईकांनी केल्यास रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला असतील.