कोरोनाकाळातही नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:56+5:302021-06-22T04:06:56+5:30

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध घातले. परंतु, त्यानंतरही अनेकांकडून कोरोनासंबंधीचे नियम मोडण्यात आले. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी ...

Violations of the rules even in the Corona period | कोरोनाकाळातही नियमांचे उल्लंघन

कोरोनाकाळातही नियमांचे उल्लंघन

Next

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध घातले. परंतु, त्यानंतरही अनेकांकडून कोरोनासंबंधीचे नियम मोडण्यात आले. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल मनपाने १,७६,२२,००० रुपयांचा दंड आकारला तर, १ जानेवारी ते ६ जून २०२१ दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणा-यांकडून शहर वाहतूक पोलिसांनी जवळपास ६ कोटी रुपयांचे शुल्क आकारले. विशेष म्हणजे, १५ मार्च ते ६ जून २०२१ या कालावधीत शहरात कडक निर्बंध असतानाही विनाकारण बाहेर फिरणा-या ६८०६ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

कोरोनाच्या दुस-या लाटेला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लावले. या काळात अत्यावश्‍यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना होत्या. मात्र, पोलिसांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करीत विनाकारण रस्त्यावर फिरताना अनेक जण दिसत होते. त्यामुळे रस्त्यावर तैनात पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. पोलिसांनी वारंवार दंडात्मक कारवाई केल्यानंतरही वाहनचालक जुमानत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी रस्‍त्यावर फिरणा-यांची वाहने जप्त करणे सुरू केले. नागपूर शहरात २०२० मध्ये वाहतुकीचे नियम मोडणा-या ६,०९,१६२ वाहनचालकांवर कारवाई केली. यातून २५,१५,३९,३०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, १ जानेवारी ते ६ जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत ३,३०,०७५ प्रकरणात ५,९९,९४,१५० म्हणजे जवळपास ६ कोटींचे शुल्क आकारले.

-लॉकडाऊनमध्येही वाहतुकीचे उल्लंघन

मागील वर्षी २०२० च्या लॉकडाऊनमध्ये २७,५५६ वाहनचालकांकडून वाहतुकीचे उल्लंघन करण्यात आल्याने त्यांच्याकडून ७,७५,४९,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. या वर्षी १५ मार्च ते ६ जून या तीन महिन्यांच्या निर्बंधाच्या काळात २५,७०८ प्रकरणांत ४,०९,२,५०० तडजोड रक्कम आकारण्यात आली.

-६,८०६ वाहने जप्त

२०२० मध्ये विविध कारणांनी वाहतूक पोलिसांनी ३०२४ वाहने जप्त केली होती. या वर्षी कडक निर्बंधांमध्ये विनाकारण बाहेर न पडण्याच्या वारंवार सूचना देऊनही न जुमानणा-या वाहनधारकांचे थेट वाहन जप्त करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला. १५ मार्च ते ६ जून २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत ६,८०६ वाहने जप्त केली.

-३८,५२६ व्यक्तींविरुद्ध कारवाई

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठले होते. परंतु त्यानंतरही कोरोनाच्या नियमांना घेऊन काही लोकांमध्ये गंभीरता नसल्याचे महानगरपालिकेच्या कारवाईतून समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरणा-या आतापर्यंत ३८,५२६ दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई करून १,७६,२२,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

-कोट...

कोरोनाच्या या काळातही मोठ्या संख्येत वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले आहे. आता निर्बंध आणखी शिथिल होणार आहे. यामुळे अपघात वाढण्याची जास्त शक्यता आहे. ते थांबविण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहनजप्तीची मोहीमही सुरू राहणार आहे. कोरोना व वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत. त्याचे पालन होणे गरजेचे आहे.

-सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (शहर)

:: बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

कालावधी : प्रकरण : दंड

१ जाने. ते ६ जून २०२० : २११५६३ : ४१३२७७००

१ जाने. ते ६ जून २०२१ : ३३००७५ : ५९९९४१५०

:: वाहने जप्त

कालावधी : प्रकरणे

-२०२० : ३०२४

-१५ मार्च ते ६ जून २०२१ : ६८०६

:: कोरोना नियमांचे उल्लंघन

-३८,५२६ नागरिकांविरुद्ध कारवाई

-१,७६,२२,००० दंड वसूल

Web Title: Violations of the rules even in the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.