बंगालमध्ये सहाव्या टप्प्याअगोदर हिंसाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:50+5:302021-04-22T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी ४३ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्याअगोदर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी ४३ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्याअगोदर विविध मतदारसंघात हिंसेच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे सुरक्षायंत्रणांवर हिंसाचारावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
गुरुवारी १ कोटी ४ लाख मतदार ३०६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील. ४३ जागांमध्ये उत्तर २४ परगणा, उत्तर दिनाजपूर, पूर्व बर्धवान, नदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदान पार पडेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता प्रचाराचा कालावधी २४ तासांनी घटविण्यात आला होता.
सहाव्या टप्प्याच्या मतदानाअगोदर उत्तर २४ परगणा व मुर्शिदाबाद येथे हिंसाचाराच्या घटना घडल्याने तणाव आहे. उत्तर २४ परगणा येथील टिटागड, भाटपाडासह विविध जागी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक वाद झाले. टिटागड येथे एकाचा मृत्यूदेखील झाला.
सहाव्या टप्प्यात भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, तृणमूलचे नेते ज्योतिप्रिय मलिक, चंद्रिमा भट्टाचार्य व माकपाचे नेते तन्मय भट्टाचार्य यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
हजारहून अधिक कंपन्या तैनात
पश्चिम बंगालमध्ये मागील चार टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. सीआयएसएफने केलेल्या कारवाईवरून राजकारणतेदेखील तापले. हिंसाचाराची लक्षात घेता सहाव्या टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या १ हजार ७१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
असा आहे सहावा टप्पा
एकूण जागा : ४३
उमेदवार : ३०६ (महिला उमेदवार-२६)
एकूण मतदार : १ कोटी ४ लाख (५३.२१ लाख पुरुष, ५०.६५ लाख महिला)
मतदान केंद्र : १४ हजार ४८०