व्हायोलिनची जुगलबंदी अन् परवीन सुल्ताना यांनी जिंकले
By admin | Published: August 3, 2014 12:57 AM2014-08-03T00:57:51+5:302014-08-03T00:57:51+5:30
प्रतिभावंत व्हायोलिनवादक गणेश-कुमरेश या बंधूद्वयाच्या व्हायोलिनवादनाची जुगलबंदी आणि सुप्रसिद्ध बेगम परवीन सुल्ताना यांच्या सुरील्या गायनाने महोत्सवाचा अखेरचा दिवस गाजला.
डॉ. वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवाचे समापन : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन
नागपूर : प्रतिभावंत व्हायोलिनवादक गणेश-कुमरेश या बंधूद्वयाच्या व्हायोलिनवादनाची जुगलबंदी आणि सुप्रसिद्ध बेगम परवीन सुल्ताना यांच्या सुरील्या गायनाने महोत्सवाचा अखेरचा दिवस गाजला. अवीट गोडीच्या संगीताचा आनंद घेण्याचा हा अनुभव नागपूरकर रसिकांची एक सायंकाळ सुरेल करणारा होता. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवाचे आयोजन डॉ. देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप बेगम परवीन सुल्ताना यांच्या सुरील्या गायनाने झाला.
पहिल्या सत्रात प्रतिभाशाली व्हायोलिनवादक गणेश - कुमरेश यांच्या कर्नाटकी रागसंगीताच्या वादनाच्या जुगलबंदीने रसिकांना जिंकले. कर्नाटकी राग संगीताच्या या वादनात रसिकांना श्रवणसुखाची मेजवानीच मिळाली. गायनातील शब्द आणि त्याचा मर्यादित अर्थ यातून स्वतंत्र असलेल्या व्हायोलिनसारख्या तंतूवाद्याच्या किमयागार कलावंतांच्या जादुई वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. दोन्ही कलावंतांची व्हायोलिनवर असणारी पकड आणि वादनातले त्यांचे प्रभुत्व वादातीत होते. कर्नाटक स्वरशैलीच्या आरंभिक तंत्रवादनाने त्यांनी वादनाला प्रारंभ केला. त्यागराजकृत कृती गायनाच्या सुरेल आलापीसह सुरु झालेल्या या गतिमान वादनातील स्वरसौंदर्य आणि अंतिम चरणातील झालासदृश वादनाने त्यांचे वादन अधिकच फुलले. झाला वादनातील क्रंदन म्हणजे या वादकांच्या कुशलतेची प्रचिती देणारे होते. यानंतर मृदंगम व घट्म या खास दाक्षिणात्य वाद्यांसह आदितालात सादर झालेल्या राग श्रीरंजनी, राग यताश्रीतील रागांची शुद्धता, लयकारीवरील वादकांची पकड, तालांगाचे उत्तम संचालन आणि व्हायोलिनच्या ‘बो’ वरील नियंत्रण यामुळे दोन्ही कलावंतांचे वादन संगीत-वादनाचा अत्युच्च आनंद देणारे ठरले.
मींडची जोरकस अनुभूती देणारे हे वादन रसिकांची दाद घेणारे होते. परस्परांचे वादन खुलवितांना कलावंतांमध्ये असणारा समन्वय साधत श्रोत्यांना आवडणाऱ्या चमत्कृतीजन्य वादनाची मजा देत दोन्ही कलावंतांनी आपल्यातील कुशल वादकाचा परिचय दिला. त्यांच्यासह मृदंगम वादक रविशंकर आणि घट्मवादक त्रिची कृष्णा यांच्या वादनाची खुमासदार जुगलबंदीही रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारी होती.
रसिकांच्या खास आग्रहास्तव राग हिंडोलमच्या आभाळस्पर्शी झुल्यांच्या हिंदोळ्यांवर या पहिल्या सत्राचे समापन करण्यात आले. पण तरीही रसिकांचे पूर्ण समाधान झाले नव्हते. अखेर पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन या कलावंतांनी वादनाचा समारोप केला. त्यांच्या वादनाचा सन्मान करताना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून त्यांचा सन्मान केला.
दुसऱ्या सत्रात बेगम परवीन सुल्ताना यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांना वेड लावले. परवीन सुल्ताना यांना ऐकण्यासाठीही नागपूरकर रसिक उत्सुक होते. त्यांनी नागपूरकरांच्या रसिकतेची प्रशंसा करून राग जोग सादर केला. ‘परम सुख पाये...’ विलंबित आणि ‘सुख दु:ख दोनो अत प्रिया रे...’ ही बंदिश द्रुत लयीत सादर करून त्यांनी जोगची सौंदर्यस्थळे आपल्या गायनातून उकलत नेली.
तिन्ही सप्तकात हुकमतीने फिरणारा त्यांचा आवाज, लयकारीची आवर्तने आणि प्रभावी गमक अंग, लक्षण प्रतिभेचे मींड ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती.
यानंतर त्यांनी राग हंसध्वनीमधील तराणा सादर करुन रसिकांची दाद दिली. एव्हाना त्यांना रसिकांच्या फर्माईशी सुरू झाल्या. अखेर त्यांनी मराठी गीत ‘रसिका तुझ्याचसाठी...’ सादर केले पण रसिक त्यांना सोडायला तयार नव्हते. रसिकांचा आग्रह पाहता त्यांनी ‘हमे तुमसे प्यार कितना...ये हम नही जानते...’ हे गीत ठुमरीच्या अंगाने सादर केले. पण रसिकांचे समाधान होत नव्हते.
पण वेळेअभावी त्यांनी भैरवी सादर करून या महोत्सवाचे समापन केले. त्यांना तबल्यावर मुकुंदराज आणि संवादिनीवर श्रीनिवास आचार्य यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर कल्पना खर्डेनवीस आणि अर्चना राजहंस होत्या. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.
याप्रसंगी केंद्रसंचालक डॉ. पीयूष कुमार, न्या भूषण गवई, न्या. प्रसन्न वऱ्हाडे, डॉ. सूद, आर्किटेक्ट हबीबखान, वेदचे देवेंद्र पारिख, भंडारी यांनी कलावंतांचे स्वागत केले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालकांच्या मार्गदर्शनात गणेश थोरात, दीपक कुळकर्णी, शशांक दंडे, दीपक पाटील, किरण सोनपिपरे, प्रेम तिवारी, गोपाळ बेतावार यांनी परिश्रम घेतले. ध्वनी संयोजन संदीप बारस्कर यांचे होते. (प्रतिनिधी)
पहिला कार्यक्रम नागपुरातच : परवीन सुल्ताना
वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम नागपुरातच झाला होता. हा कार्यक्रम त्यावेळचे स्वरसाधनाचे बाबासाहेब उत्तरवार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमातून मिळालेल्या मानधनावरच मी माझी पहिली कार खरेदी केली होती. त्यानंतर नागपूर - विदर्भात मी अनेक कार्यक्रम केले. काही वर्षे तर प्रत्येक महिन्यात माझा कार्यक्रम विदर्भात व्हायचा. नागपूरच्या रसिकांवर माझे विशेष प्रेम आहे कारण संगीत कसे ऐकावे, याचे आदर्श रसिक नागपुरात आहेत, असे कृतज्ञतेने परवीन सुल्ताना यांनी जाहीरपणे कबूल केले.