व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाची नागपुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:09 PM2018-09-05T21:09:14+5:302018-09-05T21:20:02+5:30

व्हीआयपी तसेच नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

VIP security jawan suicides in Nagpur | व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाची नागपुरात आत्महत्या

व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाची नागपुरात आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर झाडली गोळी : एमआयडीसीतील घटना, पोलीस हदरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीआयपी तसेच नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. विनोद भगवान धिवांदे (२९) असे मृत जवानाचे नाव आहे.
विनोद हा दाते ले-आऊट येथे पत्नी प्रियंका, अडीच वर्षाची मुलगी त्रिसा आणि आई-वडीलांसोबत राहत होता. तो एसआरपीमध्ये तैनात होता. वर्षभरापूर्वीच त्याला प्रतिनियुक्तीवर एसपीयूमध्ये तैनात करण्यात आले होते. व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण नेते नागपुरात असल्यावर एसपीयूचे अधिकारी आणि जवानांना ड्युटीवर लावले जाते. उर्वरित वेळी ते ‘रिजर्व्ह’ असतात. विनोद मंगळवारी रात्री घरी आला नव्हता. त्याची सासुरवाडी घराजवळच आहे. ते रात्री सासरीच झोपला. बुधवारी सकाळी ११.१५ वाजता तो घरी आला. त्याला नशेत पाहून पत्नी प्रियंकाने दारु पिण्याचे कारण विचारित सल्ला देऊ लागली. परंतु त्याने तिला कुठलही प्रतिसाद दिला नाही. ‘माझे एटीएम कार्ड तुझ्या घरी राहिले’ असे सांगत तिला एटीएम कार्ड आणण्यासाठी सासरी पाठवले. यानंतर विनोद आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याचे आई-वडील हॉलमध्येच बसले होते.
विनोदने बेडरूममध्ये जाऊन आपली सर्व्हीस पिस्तुल काढली आणि आपल्या कानपटीवर लावून गोळी झाडली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. गोळीचा आवाज एकताच आईवडील धावत बेडरुमध्ये आले. त्यांना विनोद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच शेजारी व नातेवाईकांना सूचना दिली. यानंतर एमआयडीसी पोलीसांना सूचना देण्यात आली. एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विनोदचा मृतदेह मेडिकलला रवाना करीत सर्व्हीस पिस्तुल जप्त केली.
व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाने आत्महत्या केल्यामुळे पोलीस अधिकारीही घटनास्थळीही पोहोचले. विनोदचा सुसाईड नोट सापडेल या अपेक्षेने त्याच्या घरात शोधाशोधही करण्यात आली. परंतु काहीही हाती लागले नाही. विनोदचा भाऊही एसआरपीत आहे. पोलिसांनी नातेवाईकांची विचारपूस केली. तेही आत्महत्येचे कारण सांगू शकले नाही. त्याच्या साथीदारांनी कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. परंतु जवळच्या लोकांनी मात्र कौटुंबिक कलहाची बाब नाकारली आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका विनोदच्या मामाची मुलगी आहे. चार वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कुठलाही वाद नव्हता. मानसिक धक्क्यात असल्याने पोलीसही कुटुंबीयांची सखोल विचारपूस करू शकले नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. 

 
 धोका ओळखू शकला नाही मित्र 
 घटनेच्या वेळी विनोदचा मित्र प्रीतेश आमले हा सुद्धा घरी आला होता. त्यावेळी विनोदजवळ सर्व्हिस पिस्तूल होते. असे सांगितले जाते की, पिस्तूल चालवण्याबाबत विनोद प्रीतेशला सांगत होता. विनोद नशेत असल्याने प्रीतेश घाबरला. त्याने विनोदला पिस्तूल आलमारीत सुरक्षित ठेवण्यास सांगितले आणि तो निघून गेला. तो गेल्यानंतर विनोदने आत्महत्या केली. हे समजताच प्रीतेशही अवाक् झाला. विनोद असे काही करेल याची शंकाही त्याला नव्हती. त्याला जर असे काही होऊ शकते, याची कल्पनाही आली असती तर त्याने घरच्यांना सतर्क केले असते.  

 सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 
 एसपीयू राज्य पोलिसांची सर्वात महत्त्वपूर्ण शाखा आहे. यात निवड करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली जाते. त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डसोबतच व्यक्तिगत गोष्टीही लक्षात घेतल्या जातात. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यास व्हीआयपी किंवा नेत्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. नागपुरात व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

 दोन दिवसांपासून नव्हता ड्युटीवर 
मिळालेल्या माहितीनुसार ‘रिझर्व्ह’ असल्याने विनोद दोन दिवसांपासून ड्युटीवर गेला नव्हता. दारू पिऊ लागला होता. एसपीयू अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाने पिस्तूल जारी केले जाते. पिस्तूलची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे ड्युटीवर नसतानाही पिस्तूल त्याच्याजवळच होते.                                         

Web Title: VIP security jawan suicides in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.