विपश्यना माणसाच्या आचार, विचार, व्यवहारात बदल घडवून आणते; डॉ. संजय दुधे
By आनंद डेकाटे | Published: March 16, 2024 03:04 PM2024-03-16T15:04:42+5:302024-03-16T15:05:20+5:30
तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतात मनुष्याच्या सुखाचा मार्ग सांगितला आहे. त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकविलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो.
नागपूर : तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतात मनुष्याच्या सुखाचा मार्ग सांगितला आहे. त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकविलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो. त्यांनी सांगितलेली विपश्यना ही मन शुद्ध करणारी विद्या आहे. विपश्यना माणसाच्या आचार, विचार, व्यवहारात बदल घडवून आणते, असे प्रतिपादन प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.
पाली -प्राकृत विभाग, बुद्धिस्ट स्टडीज सेंटर आणि पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय पाली भाषा परिषद पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. दुधे बोलत होते. उद्घाटक भदंत संघरत्न मानके होते. विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. प्रतिभा गेडाम, डॉ. अनोमा साखरे व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटनीय मार्गदर्शनात भदंत संघरत्न मानके यांनी मोठ्या कष्टाने तथागत बुद्धांनी मनुष्याच्या दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला असल्याचे सांगितले. हा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग या रूपाने आम्हास प्राप्त झाला. या मार्गातील समाधी हे अंग विपश्यनेचे क्षेत्र आहे. भारतातून लुप्त झालेली ही विद्या म्यानमार येथे सुरक्षित होती. ही विद्या भारतात प्रचलित करण्याचे महान कार्य आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी केले. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भदंत मानके म्हणाले.
प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी यांनी केले. संचालन, डॉ. रेखा बडोले, डॉ. कल्पना मून, डॉ. बिना नगरारे, प्रा. ममता सुखदेवे, योगिता इंगळे यांनी केले. आभार डॉ. ज्वाला डोहाने यांनी मानले.
अनोमा साखरे यांचा सत्कार
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे डी. लीट. प्रदान करण्यात आलेल्या विभागातील संशोधक, प्राध्यापिका डॉ. अनोमा साखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विभागातील विद्यार्थी अशोक रामटेके यांनी अनुवादित केलेल्या आनंद या ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. दिवसभरातील सत्रांमध्ये डॉ. प्रतिभा गेडाम, डॉ. मालती साखरे, डॉ. सुरजित कुमार सिंह, प्रा. सरोज चौधरी -वाणी,डॉ. तलत प्रवीण, डॉ. मोहन वानखेडे, कल्पना सोमकुवर, डॉ. तुळसा डोंगरे, डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनीही मार्गदशर्न केले.