सावंगी येथील पाेळ्याच्या सणावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:07+5:302021-09-07T04:12:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पाेळा हा शेतात राबणाऱ्या व शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलजाेडीच्या कष्टाच्या कृतज्ञतेचा सण. मात्र, पाेळ्याच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेळा हा शेतात राबणाऱ्या व शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलजाेडीच्या कष्टाच्या कृतज्ञतेचा सण. मात्र, पाेळ्याच्या दिवशी (साेमवार, दि. ६) सकाळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलजाेडीवर हल्ला चढविला. यात त्याने एका बैलाची शिकार केली, तर दुसऱ्या बैलाला गंभीर जखमी केले. ही घटना सावंगी (ढवळापूर) शिवारात घडली असून, पाेळ्याच्या सणावर विरजण पडले.
राजेंद्र उईके, रा.सावंगी (ढवळापूर) यांनी साेमवारी सकाळपासूनच पाेळ्याच्या सणाची तयार सुरू केली हाेती. बैलजाेडीला सजविणे व पाेळ्यात नेण्यापूर्वी त्यांनी जाेडीला त्यांच्या जंगलालगतच्या शेताजवळ चारायला नेले हाेते. दाेन्ही बैल चारा खात हाेते, तर राजेंद्र उईके जवळच्या झाडाखाली बसले हाेते. त्यातच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलजाेडीवर हल्ला चढविला.
वाघाने झडप मारून अचानक एका बैलाची मान पकडली व त्याला ओढत नेले. हा प्रकार लक्षात येताच राजेंद्र उईके काठी घेऊन बैलाला साेडविण्यासाठी वाघाच्या मागे धावले व त्यांनी वाघाच्या दिशेने काठी भिरकावली. वाघाने लगेच बैलाला साेडले व जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्या बैलाने घटनास्थळीच शेवटचा श्वास घेतला. काही वेळाने याच वाघाने परत येऊन दुसऱ्या बैलावर हल्ला चढविला. याही वेळी राजेंद्र उईके यांनी वाघाच्या दिशेने काठी भिरकावली. त्यामुळे वाघ बैलाला साेडून निघून गेला. यात दुसरा बैल गंभीर जखमी झाला.
.....
६० हजार रुपयांचे नुकसान
माहिती मिळताच, पारशिवनीचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सावंगी (ढवळापूर) गाठले व जखमी बैलावर उपचार केले. या बैलाचाही मृत्यू हाेऊ शकताे, अशी शक्यताही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या हल्ल्यात आपले ६० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती राजेंद्र उईके यांनी दिली. वनविभागाने या शेतकऱ्याला मृत बैलाचे ६० हजार रुपये व जखमी बैलाच्या उपचाराचा खर्च नुकसान भरपाई म्हणून द्यावा, अशी मागणी सरपंच प्रीती उईके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.