व्हायरल सर्दी-तापाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:20+5:302021-09-08T04:11:20+5:30
नागपूर : कोरोनाचे संकट कायम असताना मुलांमध्ये व्हायरल तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयातील ओपीडीदेखील वाढली आहे. सर्दी, ...
नागपूर : कोरोनाचे संकट कायम असताना मुलांमध्ये व्हायरल तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयातील ओपीडीदेखील वाढली आहे. सर्दी, ताप, व्हायरल किंवा कोरोना हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. पण या सर्वांची लक्षणे समान असू शकतात. त्यामुळे कुठलेही लक्षणे अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.
वातावरणातील बदलामुळे ‘व्हायरल’ रुग्णांत वाढ झाली आहे. यात लहान मुलांच्या अधिक संख्येमुळे काळजी वाढली आहे. साधारणपणे ‘व्हायरल’ची लागण झाल्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून येऊ शकतात. तसेच नाक गळणे, चोंदणे आणि सोबत खोकला अशीही लक्षणे असू शकतात. तर कोरोनाच्या लक्षणात तीव्र ताप, सततचा खोकला, चव, गंध जाणे यातील एकतरी लक्षण हमखास आढळून येतात. यामुळे अनेक पालक मेयो, मेडिकलच्या बालरोग विभागात येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.
-मेयो, मेडिकलमधील बालरोग विभागाचे वॉर्ड फुल्ल
मेयो, मेडिकलमध्ये बालरोग विभागाच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. पूर्वी मेयोमध्ये ४० ते ५० रुग्ण यायचे. आता १५० वर रुग्ण संख्या गेली आहे तर, मेडिकलच्या बालरोग विभागाच्या ओपीडीत रुग्णांची संख्या २५० च्या वर पोहचली आहे. दोन्ही रुग्णालयातील विभागाचे वॉर्ड फुल्ल असल्यासारखेच आहे. यात व्हायरलचे रुग्ण कमी असले तरी, डेंग्यू, डेंग्यू सदृश आजार व अस्थमाचे रुग्ण अधिक आहेत. मेयोच्या वॉर्डात ३० तर मेडिकलमध्ये ५० रुग्ण भरती आहेत.
-कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट
बालरोग तज्ज्ञांच्या मते, नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संंख्या कमी झाली आहे. परंतु व्हायरल व डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. या तिन्ही आजारात ताप येतो. परंतु ताप आला म्हणजे कोरोना आहेच असे नाही, पण योग्य आजाराचे निदान झाल्यास शंका कुशंकांना स्थान राहत नाही. तातडीने उपचार सुरू होतात व आजाराची गंभीरता टाळता येते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करणे गरजेचे ठरते.
-ही घ्या काळजी
सध्या पावसाची उघडझाप सुरू असलीतरी मुलांना पावसात भिजू देऊ नका. हाताच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा. आहारामध्ये भाज्या, फळे, मोड आलेल्या धान्याचा समावेश करा. सध्या डेंग्यूचा प्रकोप असल्याने अंग झाकेल असे कपडे घाला. दिवसा व रात्री मच्छरदानीचा वापर करा. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.
-बालरोग विभागाची ओपीडी वाढली
कोरोना काळात मेयोच्या बालरोग विभागात जवळपास ४० ते ५० रुग्ण यायचे, आता १५० वर रुग्ण येत आहेत. यात व्हायरल सोबतच, डेंग्यू, अस्थमा व इतरही आजाराचे रुग्ण आहेत. लहान मुलांच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, स्वत:हून औषधी देऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-ङॉ. सी. एम. बोकडे, प्रमुख, बालरोग विभाग, मेयो