पावसाच्या दडीमुळे उपराजधानीत वाढतोय ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:40 AM2018-08-11T11:40:00+5:302018-08-11T11:41:58+5:30

पावसाच्या उघडीपीमुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

'Viral' due to rain in Nagpur | पावसाच्या दडीमुळे उपराजधानीत वाढतोय ‘व्हायरल’

पावसाच्या दडीमुळे उपराजधानीत वाढतोय ‘व्हायरल’

Next
ठळक मुद्देघराघरात तापाचे रुग्णखासगीसह शासकीय रुग्णालयात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाच्या उघडीपीमुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. व्हायरल सोबतच सर्दी, खोकला व डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांतही वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बदलत्या वातावरणाचा प्रभाव शरीरावर पडतो. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. सोबतच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत आहे. यातच डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो या रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
व्हायरलसोबतच मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत आहेत.

श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमित
तज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात व्हायरल फिव्हरचे एकपेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.

वातावरण विषाणूंसाठी पोषक
सध्या शहरातील वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. विशेषत: पावसाच्या उघडीपीमुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या शिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने मेलेरिया, डेंग्यूच्या आजारही वाढत आहे.

हॅण्ड, फूट, माऊथ डिसीज
हात, पाय व तोंडात फोडं होऊन ताप असल्याचे रुग्ण अलीकडे मोठ्या संख्येत दिसून येत आहे. या फोडांकडे पाहून ‘चिकनपॉक्स’तर नाही ना, अशी शंका येते. परंतु हे ‘व्हायरल’चे एक लक्षण आहे. याला ‘हॅण्ड, फूट, माऊथ डिसिज’ म्हणूनही संबोधले जाते. अशा आजाराच्या रुग्णांनी गर्दीची ठिकाणे, शाळांमध्ये जाऊ नये. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. राजेश अग्रवाल, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ

Web Title: 'Viral' due to rain in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य