मेडिकलमध्ये 'व्हायरल लोड' : आता एचआयव्हीबाधितांच्या उपचाराला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:56 AM2020-02-12T00:56:18+5:302020-02-12T00:57:21+5:30
‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेझिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना ‘नॅको’ने ‘व्हायरल लोड’ उपकरण उपलब्ध करून दिले. मंगळवारी त्याचे लोकार्पण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेझिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबई गाठावे लागायचे. दरम्यानच्या काळात बाधितांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले जायचे. परंतु उशिरा येणाऱ्या अहवालाने उपचाराची दिशा ठरविण्यातही उशीर व्हायचा. याची दखल घेत‘नॅको’ने घेऊन ‘व्हायरल लोड’ उपकरण उपलब्ध करून दिले. मंगळवारी त्याचे लोकार्पण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले.
एचआयव्ही बाधितांना वेळेत उपचार व्हावेत , यासाठी सरकारने २००५ मध्ये ‘एआरटी’ सेंटर सुरू केले. ज्या बाधितांना ‘एआरटी’चे रेझिस्टंट झाले आहे त्यांच्यासाठी ‘सेकंड लाईन’ उपचारपद्धती नागपुरात २०११ पासून सुरू झाली. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणारा रु ग्ण आधीच शरीराने व मनाने खचलेला असतो. उपचारासोबत त्याला मानिसक आधार देणे गरजेचे असते. प्रतिकार शक्तीच नसल्याने अशा रु ग्णांना कोणत्याही आजाराचे संसर्ग लवकर होण्याची भीती राहते. अशावेळी औषधांचा प्रतिरोध झाल्यास रु णाच्या रक्तातील ‘सीडी फोर’ मोजले जाते, मात्र रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागायची. आधीच रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपतही नव्हता. विशेष म्हणजे सेकंड लाईनच्या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबईला जावे लागायचे. या शिवाय मुंबईतल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर रिपोर्ट मिळण्यासही उशीर व्हायचा. यावर उपाय म्हणून मेडिकलने बाधितांचे नमुने पुण्याच्या ‘नारी’ प्रयोगशाळेत पाठविणे सुरू केले. परंतु यातही अहवाल मिळण्यास उशीर व्हायचा. ‘व्हायरल लोड’ उपलब्ध करून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’कडे (नॅको) प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून मेडिकलच्या एआरटी सेंटरसाठी सुमारे ५० लाख किमतीचे हे यंत्र खरेदी करण्याला मंजुरी मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांकडून हे यंत्र खरेदी होऊन नुकतेच ते मेडिकलला प्राप्त झाले.
मंगळवारी याचे लोकार्पण अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी मायक्रोबायलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. सुनंदा श्रीखंडे, डॉ. आर.पी. सिंग, मुख्य प्रशासकीय अधिकारी पुरुषोत्तम दोरवे, डॉ. सुमित्रा टंकीवाले व अभय देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तांत्रिक अधिकारी प्रशांत मेश्राम, डॉ. कैलाश कराडे, डॉ. सुनंदा गजभिये, डॉ. भावना बजारे, डॉ. अश्विनी पाटील यांच्यासह केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
औरंगाबादनंतर नागपुरात दुसरी प्रयोगशाळा-डॉ. मित्रा
अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, मेडिकलच्या ‘एआरटी’ केंद्रावर एचआयव्ही बाधितांची संख्या वाढत आहे. नव्या बाधितांना उपचार सुरू करण्यापूर्वी तर जुन्या बाधितांना दर सहा महिन्यातून रक्तातील विषाणूंची संख्या मोजणे (व्हायरल लोड) गरजेचे असते. बाधितांचे नमुने पुण्याला पाठविले जायचे. याची दखल घेत ‘नॅको’ने राज्यात १० ‘व्हायरल लोड’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक औरंगाबाद तर दुसरे मेडिकलमध्ये सुरू झाले आहे. याचा फायदा बाधितांच्या उपचारात होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल.