देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील 'तो' ‘व्हायरल व्हिडीओ’.., नेमके तथ्य काय ?
By योगेश पांडे | Published: October 18, 2023 05:37 PM2023-10-18T17:37:42+5:302023-10-18T17:40:20+5:30
पोलीस आयुक्तांची नाराजी : घटनेचा विपर्यास केल्याचा दावा
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्याबाहेर भाजप पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा दावा करत एक व्हिडीओ व्हायरल झाला. परंतु प्रत्यक्षात तेथे केवळ थोडी बाचाबाची झाली होती. कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नव्हती, असे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या व्हिडीओचा खोडसाळ केल्याबाबत पोलीस आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी उपमुख्यमंत्री नागपुरात होते व त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक देवगिरीवर आले होते. त्यावेळी भाजपचेदेखील काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजयुमोचे पदाधिकारी पुष्कर पोरशेट्टीवार व पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यात आत जाण्यावरून थोडी बाचाबाची झाली व नियमानुसार रांगेत आत जाण्यास पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला व त्यात भाजप कार्यकर्त्याने पोलिसांची कॉलर पकडली असे दावे काही संकेतस्थळावर करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी याचे खंडन केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. पोलिसांना नियमानुसार काम करावे लागणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला भेटायचे असते, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनाही काही मर्यादा पाळाव्यात. देवगिरीवर जी घटना झाली त्यात गंभीर काय अगदी अदखलपात्र गुन्हा दाखल करावे असेदेखील काहीच नाही. याचा विपर्यास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांची भेटदेखील घेतली.
नेमके काय झाले होते?
संबंधित घटना झाली त्यावेळी अनेक लोक उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रांगेत उभे होते. भाजयुमोचे पदाधिकारी आले व ते थेट दुसऱ्या दरवाजाने आत जाण्याचा आग्रह करू लागले. रांगेनुसार एकाच दरवाजातून प्रवेश मिळेल असे कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र बोलण्यातून बोलणे वाढत गेले व त्यातून थोडा वाद झाला. पोलीस उपायुक्त मदने यांनी हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांना रांगेतूनच जावे लागेल असे स्पष्ट केले व त्यानंतर स्थिती सामान्य झाली. ही घटना ज्यावेळी झाली तेव्हा उपमुख्यमंत्री हे भाजपच्याच नेत्यांसोबत त्यांच्या दालनात बैठकीत व्यस्त होते.