विषाणू प्रयोगशाळा बंद होणार ! :
By admin | Published: May 13, 2016 03:12 AM2016-05-13T03:12:48+5:302016-05-13T03:12:48+5:30
मेयोच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) महत्त्वाच्या २३ चाचण्या होणार होत्या.
२३ मधून होतात केवळ ५ चाचण्या
सुमेध वाघमारे नागपूर
मेयोच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) महत्त्वाच्या २३ चाचण्या होणार होत्या. यासाठी आवश्यक २६ उपकरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु निधी असतानाही उपकरणांची खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील एकमेव प्रयोगशाळेला घेऊन मेयो प्रशासन कधी गंभीर होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
देशात विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात केवळ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो)‘व्हीआरडीएल’ला मंजुरी दिली. या प्रयोगशाळेत, हेपेटायटीस ए, ई, बी, चिकन गुनिया, जपानी ज्वर, रोटाव्हायरस, पोलिओ व्हायरस, वरसेला झोस्टर, एचएसव्ही एक आणि दोन, या सारख्या २३ चाचण्या होणार होत्या. परंतु उपकरणांच्या अभावी केवळ स्वाईन फ्लू, हेपेटायटिस ए, ई, बी, डेंग्यू, पारओ बी-१९, मिसेल्स, एचएसव्ही एक आणि दोन या चाचण्या पुरतेच ही प्रयोगशाळा मर्यादीत राहिली आहे. आता संशोधन शास्त्रज्ञासह, तंत्रज्ञाचेही कंत्राट संपल्याने चाचण्या बंद आहेत.