आयुष्याच्या अखेरीस झाली भेट
By admin | Published: March 6, 2016 02:55 AM2016-03-06T02:55:06+5:302016-03-06T02:55:06+5:30
घरात वाद झाला, अन् वयाच्या १३ व्या वर्षी त्याने ओरिसातील घर सोडले. काही तरी करवून दाखवेन, या उद्देशाने भटकत भटकत नागपूर गाठले.
१३व्या वर्षी सोडले होते घर :
मनोरुग्णालयाच्या प्रयत्नाला आले यश
नागपूर : घरात वाद झाला, अन् वयाच्या १३ व्या वर्षी त्याने ओरिसातील घर सोडले. काही तरी करवून दाखवेन, या उद्देशाने भटकत भटकत नागपूर गाठले. विविध हॉटेल्समध्ये ‘कुक’ म्हणून काम केले. परंतु अचानक एक घटना घडली आणि पोलिसांनी त्याला शासकीय मनोरुग्णालयात उपचारासाठी आणले. अडीच महिन्यातील उपचारामुळे तो बरा झाला. त्याने सांगितलेल्या घराच्या पत्त्यावर माहिती देण्यात आली. तब्बल ४८ वर्षांनंतर वयाच्या ६१ व्या वर्षी त्याने आपल्या नातेवाईकाला पाहिले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. रुग्णालय प्रशासनाचे सोपस्कार पार पडेपर्यंत त्याने नातेवाईकाचा हात सोडला नव्हता. झालेली चूक त्याला उमगली होती, जगण्याची उमेद मिळाली होती
प्रमोदकुमार ऊर्फ अगस्थ नायक असे त्या व्यक्तीचे नाव.ओरिसा, जिल्हा कंदमाल येथील दारिंगवाडी हे प्रमोदकुमारचे मूळ गाव. १३ वर्षांचा असताना घरात वादावादी झाली. त्या रात्री तो घराबाहेर पडला. काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने. रेल्वेस्थानकावर गेला. एका रेल्वेत बसला.
भटकत भटकत नागपुरात आला. पोटात भूक आणि हाताला काम मिळावे म्हणून एका हॉटेलमध्ये काम करू लागला. दुसऱ्यांची कामे पाहत पाहत तो कुक झाला. नंतर त्याने शहरातील अनेक हॉटेलमध्ये कामे केली.
परंतु यादरम्यान एकदाही घरी परतला नाही किंवा पत्र लिहिले नाही. प्रमोदकुमारला मराठी, हिंदी भाषा फारशी येत नसल्याने तो फार कमी बोलायचा.
यामुळे त्याला मित्रही नव्हते. हॉटेल हेच त्याच्यासाठी घर होते. डिसेंबर - २०१६ मध्ये एका गोष्टीवरून हॉटेल मालक आणि त्याच्यात वाद झाला. या वादामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मालकाने याची तक्रार पोलिसाकडे केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला उपचारासाठी शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.
अडीच महिन्यांच्या उपचारानंतर तो बरा झाला. त्याची भाषा समजण्यास अडचण जात होती. मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी त्यांचे उडिया असलेले मित्र एस.पी. मित्रा आणि प्रमोदकुमारची भेट घालून दिली. यामुळे त्याचे खरे नाव समोर आले आणि ओडिशाचा पत्ताही मिळाला. रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्या अनघा मोहरील यांनी ओडिशा येथील दारिंगवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांच्या घरच्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या मोठ्या भावाला विश्वासच बसला नव्हता. त्यांना बरे नसल्याने नातेवाईकांना नागपुरात पाठविले. तब्बल ४८ वर्षानंतर आपल्या नातेवाईकांना समोर पाहताच प्रमोदकुमारचे डोळे पाणावले. गळाभेट झाली.
आता परत ताटातूट होऊ नये म्हणून त्याने नातेवाईकाचे हात घट पकडून ठेवले होते. जगण्याची उमेद हरवलेल्या प्रमोदकुमारला रुग्णालयामुळे जगण्याचे बळ आणि स्वकिय मिळाले होते. जाताना तो सर्व डॉक्टरांना भेटला. वयाच्या ६१ वर्षी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
प्रमोदकुमारला बरे करण्यापासून ते त्याला घरी पाठविण्यापर्यंतच्या या कार्यात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर, उपअधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने, मनोविकृती तज्ज्ञ डॉ. मामर्डे, डॉ. बागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंगोले, डॉ. जाधव आणि सामाजिक कार्यकर्ता अनघा मोहरील यांचे विशेष प्रयत्न राहिले. (प्रतिनिधी)