स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट

By Admin | Published: May 15, 2015 02:39 AM2015-05-15T02:39:25+5:302015-05-15T02:39:25+5:30

केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

Visit of Sarsanghchalak as a volunteer | स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट

स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट

googlenewsNext

नागपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. केंद्रात सत्तेत आल्यानंतर राजनाथसिंग यांनी गुरुवारी सकाळी प्रथमच संघ मुख्यालयात हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या या भेटीदरम्यान दोघांमध्ये राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मी एक स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट घेतल्याची स्पष्टोक्ती सिंग यांनी या भेटीनंतर केली.
सकाळी ११ च्या सुमारास राजनाथसिंग संघ मुख्यालयात पोहोचले. त्यांनी त्यावेळी थेट सरसंघचालकांची भेट घेतली. सुमारे दीड तास झालेल्या बंदद्वार चर्चेत सरसंघचालकांनी त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सोबतच भूमी अधिग्रहण विधेयक, छत्तीसगड व महाराष्ट्रातील नक्षल समस्या, ‘इसिस’चा संभाव्य धोका, अंतर्गत सुरक्षा व भाजपातील अंतर्गत राजकारणावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण संघाचे स्वयंसेवक असल्याने नागपूरला आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणे स्वाभाविक असल्याचे प्रतिपादन यानंतर राजनाथसिंग यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, यावेळी संघ मुख्यालय परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.
त्यानंतर सिंग यांनी रविभवन येथे त्यांनी विदर्भातील ‘अ‍ॅन्टी नक्सल आॅपरेशन’चा आढावा घेतला. या वेळी सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा यशस्वी होईल. चीनसोबत संबंध सुधारले तर सीमावाद सुटेल. पंतप्रधान देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतील. पाकिस्तानमध्ये इसिसने केलेला हल्ला चिंताजनक आहे. दहशतवाद थांबविण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, अशी मागणी वेळोवेळी आपल्यातर्फे पाकिस्तानला करण्यात आली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तेलंगणा दौऱ्याबाबत काहीही भाष्य करणे त्यांनी टाळले. कोणते सरकार आपल्या हिताचे निर्णय घेते हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असा टोला मात्र त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)

Web Title: Visit of Sarsanghchalak as a volunteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.