उपराष्ट्रपतींची संघ स्मृतिमंदिराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:50 AM2017-11-11T01:50:13+5:302017-11-11T01:53:45+5:30

देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली.

Visit to the team memorial of Vice President | उपराष्ट्रपतींची संघ स्मृतिमंदिराला भेट

उपराष्ट्रपतींची संघ स्मृतिमंदिराला भेट

Next
ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांची धावपळ : भेट देणारे ठरले पहिले उपराष्ट्रपती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संघस्थानाला भेट देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले.
‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपराष्ट्रपतींचा ताफा कार्यक्रमस्थळातून निघाला. मात्र ऐनवेळी विमानतळाऐवजी ताफा स्मृतिमंदिर परिसरात शिरला. यावेळी उपराष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली. अनेक पोलीस अधिकारी तर धावतच स्मृतिमंदिरात पोहोचले.
विशेष म्हणजे यावेळी संघाच्या ४५ हून अधिक वयाच्या स्वयंसेवकांचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय वर्ष वर्ग सुरू होता. संघस्थानावर सुमारे ८०० स्वयंसेवक जमले असतानाच उपराष्ट्रपती तेथे पोहोचल्याने सर्वांमध्ये उत्सुकता दिसून आली. संघातर्फे सहसरकार्यवाह सुरेश सोनी, तृतीय वर्ष सर्वाधिकारी नानासाहेब जाधव, महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी सुरेश सोनी यांनी उपराष्ट्रपतींना भारतमातेची प्रतिमा भेट दिली.
यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.
अखेर नायडूंनी योग साधला
२०१४ साली केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून नागपुरात ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांची वर्दळ वाढली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शहराला भेट दिली. मात्र त्यांनी संघस्थानी भेट देण्याचे टाळले होते. त्यामुळे उपराष्ट्रपतीदेखील तोच कित्ता गिरवतील, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी उपराष्ट्रपतींनी संघ स्मृतिमंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. याअगोदर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००० साली संघ मुख्यालयाला भेट दिली होती. वेंकय्या नायडू यांनी संघस्थानाला भेट दिल्यामुळे संघ वर्तुळातूनदेखील समाधान व्यक्त करण्यात आले. वेंकय्या नायडू हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. स्वयंसेवक असताना, भाजपा अध्यक्ष झाल्यावर,केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अनेकदा नागपूर तसेच संघ मुख्यालयाला भेट दिली आहे. उपराष्ट्रपती म्हणून त्यांची ही पहिली भेट ठरली.

Web Title: Visit to the team memorial of Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.