नागपूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:42 PM2020-08-17T20:42:35+5:302020-08-17T20:44:36+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यागतांना बंदी घातली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले असून, आतापर्यंत ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यागतांना बंदी घातली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले असून, आतापर्यंत ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. सोमवारी निघालेले दोन पॉझिटिव्ह सामान्य प्रशासन विभागातील असल्याने, विभागातील कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत.
१२ ऑगस्ट रोजी २ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानंतर १३ व १४ ऑगस्ट रोजी आरोग्य व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविभवन येथे कोरोना चाचणी करून घेतली. त्यात आणखी २ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एक कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्याचा संपूर्ण कार्यक्रमात वावर होता. जिल्हा परिषदेतील आरोग्य, शिक्षण, सामान्य प्रशासन, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ८ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी हे सामूहिक दीर्घ रजेवर गेले आहेत. सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असून शासनाच्या निदेर्शानुसार रोटेशन पद्धतीने मर्यादित उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.
जिल्हा परिषदेने घातलेले निर्बंध
जिल्हा परिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी व जि.प. सदस्यांव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश नाही.
जि.प.च्या सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक
कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर
ई-मेल चेक करणे व उत्तर देण्याची जबाबदारी विभागप्रमुखाची
मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्व विभागांची एकत्रित आवक-जावक व्यवस्था.
सर्व विभागातील आवक शाखेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्या त्या विभागाची डाक प्राप्त करून घ्यावी.
आवक विभागात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क वापरावे.
सर्व विभागाच्या दर्शनी भागावर अभ्यागतांना प्रवेश बंद असे फलक लावावे.
कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत दुपारच्या जेवणासाठी समूहाने बसू नये.
मुख्यालय ४८ तास बंद ठेवा
नागपूर जिल्हा परिषदेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद कार्यालय किमान ४८ तासासाठी बंद ठेवून निर्जंतुकीकरण करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी अशा उपाययोजना केल्या आहेत. खुद्द राज्य शासनाचे ग्राम विकास विभाग ३ दिवस बंद ठेवण्यात आले होते, हे त्यांनी सीईओंच्या लक्षात आणून दिले आहे.