रशिया, सायबेरिया, मंगोलियाचे पाहुणे विदर्भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:00 AM2020-11-12T07:00:00+5:302020-11-12T07:00:05+5:30
Birds Nagpur News साधरणत: नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागताच या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू हाेते आणि अपेक्षेप्रमाणे ते सुरूही झाले आहे. या पक्ष्यांनी नागपूरला धावती भेट देऊन मुक्काम चंद्रपूर, भंडारा व नवेगावबांधच्या तलावांकडे वळवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात जसजशी थंडी पडायला सुरुवात होते तशी प्रतीक्षा लागते ती विदेशातून येणाऱ्या मनमोहक पाहुण्यांची. या पाहुण्यांचे आगमन म्हणजे पक्षिमित्रांसाठी एक पर्वणीच असते. अपेक्षेप्रमाणे रशिया, सायबेरिया, मंगोलिया, युरोपपासून हिमालयापर्यंतचे हे पाहुणे शेकडो, हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोहचले आहेत. मुक्तविहार करणाऱ्या या पक्ष्यांची गर्दी येथील तलावांवर बघायला मिळत आहे.
साधरणत: नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागताच या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू हाेते आणि अपेक्षेप्रमाणे ते सुरूही झाले आहे. विशेषत: बदक वर्गीय पक्षी माेठ्या प्रमाणात येतात. यामध्ये काॅमन पाेचार्ड (माेठी लालसरी), रेड क्रेस्टेड पाेचार्ड, शिटी वाजविणारे बदक आदींचा समावेश आहे. याशिवाय बार हेडेड गील्ड, नाॅर्दर्न शाॅवलर, गढवाल हे पक्षी माेठ्या प्रमाणात स्थलांतरित हाेतात. रशिया व युराेपच्या प्रदेशात या काळात माेठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो. त्यामुळे हे सारे पक्षी हजाराे किमीचा प्रवास करून उष्ण कटीबंधीय प्रदेश असलेल्या भारतात अन्नाच्या शाेधात येतात. या काळात १२५ प्रजातीचे पक्षी विदर्भात येत असल्याचे पक्षी अभ्यासक अविनाश लाेंढे यांनी सांगितले.
नागपूरऐवजी भंडारा, नवेगावबांधला मुक्काम
दरम्यान, प्रवासी पक्ष्यांचे आगमन झाले असले तरी त्यांचा मुक्काम नागपूरला नाही. यावर्षी जाेरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील तलाव काठाेकाठ भरले आहेत. शेतीलाही पाणी साेडलेले नाही. तलाव थाेडे रिकामे असल्यास मासे व किडे टिपण्यासासाठी या पक्ष्यांना चिखलयुक्त किनारा मिळताे. त्यामुळे या पक्ष्यांनी नागपूरला धावती भेट देऊन मुक्काम चंद्रपूर, भंडारा व नवेगावबांधच्या तलावांकडे वळवला आहे. उमरेडच्या काही तलावांवर मात्र त्यांची गर्दी बघावायस मिळत असल्याचे अविनाश लाेंढे यांनी सांगितले.