नागपुरातील बाजारपेठांमध्ये चैतन्य; व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:33 PM2020-06-05T21:33:52+5:302020-06-05T21:43:56+5:30
तब्ब्ल अडीच महिन्यानंतर शुक्रवारपासून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्या. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठांमध्ये चैतन्य, तर व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ग्राहक घराबाहेर पडल्याने बाजारातील मरगळ दूर होऊन बाजारात चैतन्याचा साज चढला. आर्थिक उलाढालीने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्ब्ल अडीच महिन्यानंतर शुक्रवारपासून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्या. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठांमध्ये चैतन्य, तर व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ग्राहक घराबाहेर पडल्याने बाजारातील मरगळ दूर होऊन बाजारात चैतन्याचा साज चढला. आर्थिक उलाढालीने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता.
सॅनिटाईझ्ड करून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. ग्राहकही खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पुढे ग्राहक आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात येतील, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. सदर प्रतिनिधीने बाजाराचा फेरफेटका मारला असता व्यापारी आनंदी दिसत होते. सर्वच दुकानांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांनी हॅण्डग्लोव्हज घातले होते.
शुक्रवारी पूर्व-उत्तर मुखी दुकाने सुरू करण्याची परवानगी असल्याने बाजारपेठांमधील अर्धीच दुकाने खुली होती. शनिवारी पश्चिम आणि दक्षिण मुखी दुकाने सुरू राहणार असून शुक्रवारी सुरू असलेली दुकाने बंद राहील. ही रचना २९ जूनपर्यंत राहणार असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने खुली राहतील.
महाल-केळीबाग रोड दुकानदार संघाचे प्रेमानी म्हणाले, महाल, केळीबाग रोड आणि बडकस चौक या भागातील दुकाने आज सुरू झाली. सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत ग्राहकांची संख्या कमी होती. पण दुपारी १२ नंतर ग्राहक वाढले आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केली. अडीच महिने दुकाने बंद राहिल्याने दुकानदारांनी सकाळीच दुकाने स्वच्छ आणि सॅनिटाईझ्ड केली. वस्तूंची नीट रचना केली. ग्राहकांसाठी दुकानाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची व्यवस्था केली होती. याशिवाय कर्मचाºयांना हॅण्डग्लोव्हज उपलब्ध करून दिले. व्यवसाय वाढवायचा आहे, कोरोना नको, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांची काळजी घेऊनच व्यवसायाला प्रारंभ केला आहे. सध्या ग्राहक कमी असले तरीही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडतील आणि व्यवसाय वाढेल, असा विश्वास प्रेमानी यांनी व्यक्त केला.
सध्या दुकानात आवश्यक मालाची कमतरता आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी पाहून दुकानात नवीन मालाचा भरणा करावा लागेल. भांडवलाची कमतरता असल्याने मालाची खरेदी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे सक्करदरा येथील प्रज्ज्वल शुक्ला यांनी सांगितले.
सीताबर्डी येथील गेसन्स मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले दिलीप धोटे म्हणाले, आमच्यासमोर दुकानात दोन ग्राहक आले तेव्हा त्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले आणि दुकानदारांनी दोघांनाही आपल्याकडील मास्क दिले. यावरून कोरोनाबाबत दुकानदार सजग असल्याचे दिसून आल्याचे धोटे यांनी स्पष्ट केले.
महाल येथील शू-प्लाझाचे संचालक महेंद्र म्हणाले, महाल बाजारात पूर्व-उत्तर दिशेला प्रवेशद्वार असलेली दुकाने सुरू झाली. सदर प्रतिनिधीने पाहणी केली असता महाल चौकातून टिळक पुतळ्याकडे जाताना उत्तर दिशेला शटर असलेली उघडी दिसली. तर समोरील दक्षिण दिशेकडील दुकाने बंद होती. येथील दुकानदारांनी नियमाचे पालन केल्याचे दिसून आले. इतवारी सराफा बाजारातही बहुतांश पूर्व दिशेकडील सराफांची दुकाने उघडी होती. सोने आणि चांदीचे भाव आकाशाला भिडल्याने दुकानांमध्ये खरेदीदार नव्हते.
उत्तर नागपुरात सम-विषमबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम
उत्तर नागपुरात कमाल चौक बाजारात सकाळी सम-विषम नियमाबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बाजारातील सर्वच दुकाने सकाळी ९ वाजता उघडली. पूर्व-उत्तरकडे शटर असलेल्या दुकानदारांनी यावर आक्षेप घेतला. काही दुकानदारांनी आसीनगर झोनचे अधिकारी राठोड यांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पश्चिम-दक्षिण गेट असलेली दुकाने बंद करण्यास सांगितली. मनपाच्या आदेशात कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरू करण्यास मनाई आहे. त्यानंतरही दुकाने सुरू करून मनपाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार काही दुकानदारांनी झोन अधिकाऱ्यांकडे केली. या सर्व घडामोडीत आमचे नुकसान होत असल्याचे काही दुकानदारांनी सदर प्रतिनिधीला मोबाईलवरून सांगितले.
हीच स्थिती सीताबर्डी येथील दुकानदारांमध्ये होती. सीताबर्डी येथील इलेक्ट्रॉनिक्सची सर्वच दुकाने खुली होती. येथील दुकाने गल्लीबोळांमध्ये असल्याने दिशांचा घोळ दुकानदारांमध्ये दिसून आला. धंतोली भागात पश्चिम दिशेकडील काही दुकाने सुरू होती.
व्यापार वाढवा, कोरोना नको
व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून उत्साहात दुकाने सुरू केली. त्यांनी व्यापार वाढवावा, पण कोरोना नको, अशी भूमिका दुकानदारांनी ठेवावी. व्यापार करताना दुकानदारांना ग्राहकांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याकरिता सर्वच दुकानांमध्ये सॅनिटायझर व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांनी हॅण्डग्लोज घालणे आवश्यक आहे. मनपाच्या अटी व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. ग्राहकांनाही नियमांचे पालन करून खरेदी करावी, असे दुकानदारांचे मत आहे.