‘सीईटी’त झळकला वैदर्भीय बाणा
By admin | Published: June 2, 2016 03:10 AM2016-06-02T03:10:32+5:302016-06-02T03:10:32+5:30
बुधवारी जाहीर झालेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात विदर्भातील विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळविल्याचे दिसून आले.
नागपूर : बुधवारी जाहीर झालेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात विदर्भातील विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळविल्याचे दिसून आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘नीट’संदर्भात गोंधळ आणि संभ्रम सुरू असताना सर्वच विद्यार्थी तणावात होते. या स्थितीतदेखील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्यात सर्वात जास्त १२ हजार २०३ विद्यार्थी विदर्भातून पात्र ठरले आहेत. मराठवाड्यातून ११ हजार ८९० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मराठवाड्यातील पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी २१.६१ टक्के आहे तर विदर्भातील टक्केवारी २०.९१ टक्के इतकी आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे समुपदेशन १४ पासून
‘एमएचटी-सीईटी’चे निकाल घोषित झाल्यानंतर बुधवारी राज्य प्रवेश नियंत्रण मंडळ व ‘सीईटी सेल’ने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची तारीख घोषित केली. ‘अॅडिशनल वेटेज’साठी विद्यार्थ्यांना २ जूनपासून ‘आॅनलाईन’ माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत यासंबंधात कागदपत्रे जमा करावी लागतील.
यानंतर १० जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. सोबतच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येईल. १४ जूनपासून ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’साठी समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार विकल्प अर्ज भरण्यासाठी बोलविण्यात येईल. ६ जुलै रोजी पहिली निवड यादी जाहीर होईल. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.