शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

By admin | Published: February 20, 2016 03:30 AM2016-02-20T03:30:21+5:302016-02-20T03:30:21+5:30

व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही.

Vivek awakens through Shivcharitra | शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

Next

दिलीप चौधरी : मराठा सेवा संघातर्फे शिवजयंती उत्सव
नागपूर : व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही. ज्यावेळी आपल्या हाती धुपाटणेच राहते त्यावेळी मात्र आपण फसविले गेल्याचे लक्षात येते. तथाकथित व्यवस्था माणसांच्या मेंदूचा ताबा घेते आणि विवेकाने विचार करण्याची वृत्ती थांबविली जाते. शिवचरित्र मात्र आपल्याला डोळस करते आणि आपला विवेक जागृत करते. त्यामुळेच आजच्या काळातही शिवचरित्र अभ्यासण्याची गरज ३५० वर्षानंतर वाटते आहे, असे मत शिवसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त एका महोत्सवाचे आयोजन मराठा सेवा संघ लॉन, सुर्वेनगर येथे केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चौधरी ‘बदलत्या परिस्थितीत शिवचरित्राची भूमिका’ विषयावर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक अरबट, डॉ. निकुंज पवार, उत्तमराव सुळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. जी. येवले, श्रीमंत कोकाटे, प्रभाकर देशमुख, आ. सुनील केदार, अविनाश काकडे, प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम कडू, दिनेश ठाकरे, रामकृष्ण ठेंगडी, अनिता वानखेडे, जमाते इस्लामीचे अध्यक्ष उमरखान, गिरधर मरडिया, उमेशबाबू चौबे उपस्थित होते.
दिलीप चौधरी म्हणाले, महाराजांनी उपयोगात आणलेली शस्त्रे आता संग्रहालयात असली तरी त्यांचे विचार मात्र सार्वत्रिक आहेत. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रातून सापडतात. आपण इतिहासाची शिकवण विसरलो त्यामुळेच अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत.
शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मात्र जाणीवपूर्वक बहुजनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना इतिहास चुकीचा लिहिला गेला. लोकशाही सरकारच्या निर्णयावर उद्योजकांचा प्रभाव वाढतो आहे. अशा वेळी शिवचरित्रातून आपला विवेक आणि सद्बुद्धी जागृत होते, असे सांगताना त्यांनी काही उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. अविनाश काकडे म्हणाले, संभाजीला औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिली. त्याला मनुस्मृती माहीत नव्हती. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी शिवाजींची प्रतिमा करण्यात आली पण त्यात तथ्य नाही.
श्रीमंत कोकाटे म्हणाले, महाराजांनी रयतेचे राज्य केले. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा लढा मुस्लिमांविरुद्ध नव्हताच. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास त्यांचे गुरु नव्हते. पण जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास आपल्यावर लादला गेला. त्यांच्या अनुयायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा घाट घातला गेला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नाहीत. शासनानेही महाराजांची अर्थव्यवस्था तपासून पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर आणि सविता कराळ यांनी केले. प्रास्ताविक विनोद खोडके यांनी केले. प्रारंभी आदित्य लोहे यांनी ‘सह्याद्रीचा छावा’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद वैद्य, विजय बेले, प्रशांत कोहळे, अशोक डहाके, अभिजित दळवी, नितीन ठवकर, श्याम डहाके आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Vivek awakens through Shivcharitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.