विवेकानंद स्मारकातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल

By admin | Published: January 2, 2017 02:22 AM2017-01-02T02:22:34+5:302017-01-02T02:22:34+5:30

सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक

Vivekananda memorial will inspire patriotism | विवेकानंद स्मारकातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल

विवेकानंद स्मारकातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल

Next

देवेंद्र फडणवीस : स्वामी विवेकानंद यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण
नागपूर : सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर नवी ओळख दिली. जगाला नवा विचार दिला. त्यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकातून युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
कन्याकुमारीच्या धर्तीवर अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईट येथे महापलिकेने स्वामी विवेकानंदचे भव्य स्मारक उभारले आहे. ३० फूट उंच खडकावर २० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा स्वामीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. साडेसात एकर जागेत ७.५ कोटी खर्च करुन नयनरम्य असे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकात संपूर्ण वातानुकूलित सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन चरित्र प्रदर्शन, आकर्षक विद्युत रोषणाई, अद्ययावत ध्वनिव्यवस्था, प्रशस्त पार्किंग, जलाशय बेटावर नयनरम्य हिरवळ व आकर्षक कारंजे, स्वामीजींच्या जीवनावर आधारित १७ एलइडी स्क्रीनवर स्वामीजींच्या जीवनावर आधारित प्रेरित कथा ऐकण्याची संधी तसेच स्वामीजींच्या जीवनावरील आधारित २८ नयनरम्य म्युरल असणार आहेत. या स्मारकाचे मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महापौर प्रवीण दटके, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष ब्रह्मस्थानंद , खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, परिणय फुके, उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी , जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
स्वामीजींचे हे स्मारक राष्ट्रीय स्तरावरील स्मारकाशी साधर्म्य सांगणारे आहे. स्वामी विवेकानंदानी प्रगती व प्रेरणेचा विचार दिला. आपल्या जीवनावर सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव असून आपण त्यांनी दाखवून दिलेल्या विचाराचे अनुकरण करूनच विकास करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान आज देश भ्रष्टाचार, काळेधन, बेरोजगारी व गरिबी या विरोधात लढा देत आहे. स्वामींच्या मते हा लढा म्हणजे देशभक्ती असून यात सहभागी होऊन तरुणांनी देशभक्तीच्या व विकासाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. स्वामींच्या स्मारकापासून प्रेरणा घेऊन समाजाने आपले जीवन उज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेने अतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय स्मारक बनविले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने या स्मारकाची सहल घडवून आणावी. यामुळे स्वामीच्या जीवनकार्याचा व विचाराचा परिचय नव्या पिढीला घडेल. विवेकानंद स्वामी यांचा मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीवर भर होता. स्वामींच्या स्वप्नातील भारताचा परिचय घडवून देणारे हे स्मारक असून नव्या पिढीला यापासून ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. या स्मारकात फाऊंटन निर्माण करण्यासाठी निधी नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी निदर्शनास आणून दिल्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की या ठिकाणी सुरेख फाऊंटन निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार अजय संचेती व डॉ. विकास महात्मे यांनी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे कबूल केल्याची माहिती दिली.
यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील नागरिकांना जमिनीचे पट्टे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिल्पकार राम सुतार, कंत्राटदार वकीलसिंग, वास्तुशास्त्रज्ञ उदय गजभिये, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेसह विविध अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महापौर प्रवीण दटके व स्वामी ब्रह्मानंद यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्याला नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Vivekananda memorial will inspire patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.