व्हीएनआयटी : १०० पीएचडीधारकांसह ११५३ विद्यार्थ्यांना पदवीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:46 PM2019-09-13T22:46:51+5:302019-09-13T22:52:46+5:30
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी), नागपूरचा १७ वा दीक्षांत समारोह येत्या १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी), नागपूरचा १७ वा दीक्षांत समारोह येत्या १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन संजय किर्लोस्कर हे या समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे चेअरमन डॉ. विश्राम जामदार हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील.
डॉ. जामदार यांच्यासह व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे, अकॅडमिकचे अधिष्ठाता प्रा. एस.बी. ठोंबरे व रजिस्ट्रार प्रा. एस.आर. साठे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. प्रा. पडोळे यांनी सांगितले, यावर्षी पहिल्यांदाच शंभरपेक्षा जास्त पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारोहात पुरस्कृत केले जाणार आहे. याशिवाय एम.टेक.चे २६८, एम.एस.चे ५३ तसेच ६७७ बी.टेक. पदवीधर व आर्किटेक्चरच्या ५५ पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसह ११५३ विद्यार्थी अवॉर्ड प्राप्त करणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या संशोधकांना १०४ पदक व पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हीएनआयटीचे २१ हजारापेक्षा अधिक माजी विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांना सामान्य प्रशासन, तंत्रज्ञान, शैक्षणिक, संशोधन तसेच महिला इंजिनीअर्स व यंग अचिव्हर्स आदी विभागात विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याचे प्रा. पडोळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. जामदार यांनी व्हीएनआयटीने वर्षभरात मिळविलेले यश व उपक्रमांची माहिती दिली. संस्थेमधून दरवर्षी ५० ते ६० पेटेंटसाठी अर्ज प्राप्त होतात व यावर्षी पाच संशोधकांचे पेटेंट पुरस्कृत करण्यात आले. आंतरविद्यापीठ अभ्यासक्रमाअंतर्गत मागील वर्षी दोन विद्यार्थ्यांनी आयआयटी चेन्नईमध्ये पदवीचे शेवटचे वर्ष पूर्ण केले. यावर्षी चार विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले. संस्थेच्या संशोधकांनी सामान्य शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे ८३ कृषी उपयोगी साहित्य तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे जुलै-आॅगस्ट महिन्यात ‘क्लिनेथॉन’चे आयोजन केले होते, यामध्ये अपेक्षेपेक्षा दुप्पट म्हणजे ७०० च्यावर विद्यार्थी, प्राध्यापक व संचालक मंडळातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. यावर्षी संस्थेमध्ये २५ नव्या कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट दिली होती व यातून ३५० बी.टेक. व ६० एम.टेक.च्या विद्यार्थ्यांनी जॉब प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय इस्रो, लघु व मध्यम उद्योग विभाग तसेच शासनाच्या अटल इनोव्हेशनशी स्टार्टअपसाठी करार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २५ किलोमीटर दूर नवरमारी येथे आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमासह संस्थेच्या इतर उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक शाखेत २५ अशा १००० जागा वाढविण्यात आल्या असून सध्या ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत प्रा. डी.आर. पेशवे, प्रा. व्ही.बी. बोरघाटे, प्रा. जी.पी. सिंह, प्रा. बी.एस. उमरे, प्रा. राळेगावकर आदी उपस्थित होते.
२०२० ला व्हीएनआयटीचा हीरक महोत्सव
पुढल्या वर्षी २०२० ला व्हीएनआयटी संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचे डॉ. जामदार यांनी सांगितले. संस्थेच्या आवारात भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात येणार आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी व डिझाइनर भरत येमसनवार हे या १० फुटाच्या पुतळ्याचे डिझाइन तयार करीत आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था साकारण्यात येत आहे. यामध्ये प्रशस्त असे फुटबॉल मैदान, दोन टेनिस कोर्ट, रनिंग ट्रॅक तसेच एक लहान स्टेडियम उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पक्ष्यांच्या प्रजाती व प्राण्यांना निवारा होईल असा तलावही व्हीएनआयटी कॅम्पस परिसरात तयार करण्यात येणार आहे. अशाप्रकारे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ११ प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यापैकी पाच प्रकल्पांवर काम सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.