‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:48 AM2017-11-06T01:48:02+5:302017-11-06T01:48:15+5:30

देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे.

VNIT professor dies due to dengue | ‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कॅम्पस’मधील विद्यार्थी दहशतीत : मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डंख’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे. सहायक प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी असे त्यांचे नाव असून ते गणित विभागात सहायक प्राध्यापक होते. संस्थेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात डास झाले असून या सत्रात आतापर्यंत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मनपाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या मोठी झाली असल्याचा आरोप ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने केला आहे.
वीरेंद्र अवस्थी हे ‘व्हीएनआयटी’च्या परिसरात राहत नसले तरी रात्री उशिरापर्यंत ते विभागात काम करत रहायचे. शिवाय त्यांचे निवासस्थान ‘व्हीएनआयटी’च्या जवळच होते. मागील आठवड्यापर्यंत ते चांगले कार्यरत होते. मात्र अचानक त्यांना ताप भरला व तपासणीअंती तो ‘डेंग्यू’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रामदासपेठेतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र ‘प्लेटलेट्स’ची संख्या अतिशय कमी झाल्यामुळे उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातच त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवस्थी यांच्या पश्चात पत्नी अलका, दोन मुले व अवघी तीन महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्यावर जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
गणिताच्या क्षेत्रात अवस्थी यांचा सखोल अभ्यास होता व ‘अलझेब्रिक टोपोलॉजी’मध्ये त्यांचे संशोधन होते. कोलकाता येथील ‘आयआयएसईआर’ तसेच हैदराबाद येथे ‘बिट्स पिलानी’च्या ‘कॅम्पस’मध्येदेखील ते अगोदर कार्यरत होते.
जुलै २०१६ पासून ते ‘व्हीएनआयटी’त शिकवत होते. त्यांच्या मृत्युमुळे ‘व्हीएनआयटी’त शोककळा पसरली होती. वसतिगृहांमधील अनेक विद्यार्थी तर दहशतीमध्ये आहेत.
मनपा हलगर्जीपणा ?
यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ.नरेंद्र चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी झालेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’ परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी झाडे आहेत. परिसरात सुबाभूळ झाडांचे लक्षणीय प्रमाण असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा होते. मात्र सुबाभूळ झाडांमुळे या पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. सोबतच ‘फॉगिंग मशीन’देखील तेथे नेणे शक्य होत नाही. याबाबत आम्ही मनपाला कळविलेदेखील होते. मात्र दोन आठवडे उलटून गेल्यानंतरदेखील प्रशासनाने ‘डेंग्यू’ची बाब गंभीरतेने घेतली नाही. अखेर आम्ही सुमारे आमच्या पातळीवर औषधांची फवारणी केली व ६० झाडे कापली. मात्र त्यानंतर लगेच आम्हाला नोटीस देण्यात आली. मात्र ‘डेंग्यू’च्या नियंत्रणासाठी कुठलेही सहकार्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
२१५.२६ एकर क्षेत्रफळात ‘व्हीएनआयटी’चा विस्तार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या परिसरातच विद्यार्थ्यांचे वसतिगृहदेखील आहे. पावसाळ्यानंतर परिसरातील काही भागांमध्ये पाणी साचले व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. या साचलेल्या पाण्यात ‘डेंग्यू’च्या डासांची पैदास झाली व अनेक विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली.
मागील पंधरवड्यापर्यंत ‘व्हीएनआयटी’च्या इस्पितळात ५७ विद्यार्थ्यांवर उपचार झाले. मात्र अनेक विद्यार्थी उपचारांसाठी थेट खासगी दवाखान्यात गेले होते. आतापर्यंत येथील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना ‘डेंग्यू’ची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांसोबत अधिकारी-कर्मचारीदेखील दहशतीत
‘कॅम्पस’मध्ये अनेक प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचाºयांचीदेखील निवासस्थाने आहेत. शिवाय अनेक प्राध्यापक, संशोधक रात्री उशिरापर्यंत विभागांमध्ये काम करत असतात. ‘व्हीएनआयटी’तील वसतिगृहांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सर्वाधिक ‘डेंग्यू’ची लागण झाली आहे. मात्र वीरेंद्र अवस्थी यांच्या मृत्यूनंतर सर्वांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: VNIT professor dies due to dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.