‘हार्वर्ड’मध्ये ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:18 AM2019-05-14T01:18:04+5:302019-05-14T01:18:56+5:30
साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकेथॉन’ स्पर्धेत या चमूने जगभरातून तिसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे अशी कामगिरी बजाविणारी ही एकमेव भारतीय चमू ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकेथॉन’ स्पर्धेत या चमूने जगभरातून तिसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे अशी कामगिरी बजाविणारी ही एकमेव भारतीय चमू ठरली आहे.
‘हार्वर्ड’ विद्यापीठातर्फे जगभरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल हॅकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यात पर्यावरण या गटात ‘व्हीएनआयटी’च्या बीटेक ‘केमिकल इंजिनिअरींग’च्या विद्यार्थ्यांची चमू सहभागी झाली होती. यात विष्णू मामिडी, उत्कर्ष गुप्ता आणि सुमित साबू यांचा समावेश होता. या चमूने हॉटेल्स व मेसमधील अन्नाची नासाडी व वाया जाणारे प्रमाण कमी करणे तसेच जागृतीसंदर्भात ‘सोल्युशन’ मांडले. जेवण टेबलावर येईपर्यंत एकूण प्रक्रियेत किती पाणी वापरण्यात आले आहे, याची माहितीदेखील माध्यमातून उपलब्ध होण्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी ‘व्हिस्टा’ या ‘वेब पोर्टल’च्या माध्यमातून ‘सोल्युशन्स’ मांडले. या माध्यमातून ग्राहकांना जेवणाचे वाया जाणारे प्रमाण समजणार आहे. सोबतच संबंधित रेस्टॉरेन्टलादेखील याची आपसूकच माहिती मिळणार आहे. यामुळे जनजागृती होईल व अन्नाची नासाडी थांबेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. डॉ.सचिन मांडवगणे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.