‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 11:45 PM2018-10-03T23:45:54+5:302018-10-03T23:50:25+5:30
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.
मागील आठवड्यात सुमारे १० विद्यार्थिनीना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे होते. त्या विद्यार्थिनींना रामदासपेठ येथील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर १८० हून अधिक विद्यार्थिनींमध्ये ताप, उलट्या, अंगदुखी ही लक्षणे दिसून आली. या विद्यार्थिनींनी विविध इस्पितळांत उपचार घेतले. मात्र १२ विद्यार्थिनी या ‘आयसीयू’मध्ये असून प्रशासनाने त्यांना पाहण्याचीदेखील तसदी घेतली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. सायंकाळी सहा वाजता प्रशासनातील अधिकारी, अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे वसतिगृहाच्या समस्यांविरोधात तीनशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रात्री आठनंतर एकत्र आले व प्रशासनाविरोधात घोषणा सुरू केल्या.
‘व्हीएनआयटी’ प्रशासनाकडून मौन
दरम्यान या मुद्दयावर ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासनाकडून मौन साधण्यात आले आहे. बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ‘व्हीएनआयटी’च्या अधिष्ठात्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हवामान बदलामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने संचालक, अधिष्ठाता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या आत जाण्याची मनाई करण्यात आली.
या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या
विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे प्रशासनासमोर मागण्या मांडल्या. सर्वात अगोदर तर वसतीगृहातील जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा व वेळ पडली तर कंत्राटदार बदला. खानावळीची नियमित तपासणी व्हावी, खानावळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, संपूर्ण वसतिगृह आणि स्वच्छतागृहे यांची स्वच्छता करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
पालकांना सूचना नाही
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींची तब्येत खालावली असतानादेखील प्रशासनाने पालकांना सूचना दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्याचप्रमाणे उपचारांसाठी विमा असल्याचे कारण देत खर्च करण्यासदेखील नकार दिला आहे. आम्ही आमच्या खिशातून सध्या खर्च करत असल्याची माहिती इस्पितळात दाखल असलेल्या विद्यार्थिनींच्या सहकाऱ्यांनी दिली.
अ़नेक विद्यार्थी बाहेर ताटकळले
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सर्व प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे कोचिंग क्लास, प्रोजेक्ट इत्यादींच्या कामाने बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. रात्री उशीरापर्यंत काही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेरच ताटकळत उभे होते.