‘व्हीएनआयटी’त ३६ गुणवंतांचा होणार सत्कार

By admin | Published: September 13, 2015 03:10 AM2015-09-13T03:10:26+5:302015-09-13T03:10:26+5:30

१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

VNIT will be honored with 36 skills | ‘व्हीएनआयटी’त ३६ गुणवंतांचा होणार सत्कार

‘व्हीएनआयटी’त ३६ गुणवंतांचा होणार सत्कार

Next

दीक्षांत समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्था : समारंभाची होणार रंगीत तालीम
नागपूर : १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी परंपरेला फाटा देत केवळ ३६ गुणवंतांचा विविध पारितोषिकांनी मंचावर सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमात ऐनवेळी गोंधळ व्हायला नको यासाठी समारंभाची एक दिवस अगोदर रंगीत तालीमदेखील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘व्हीएनआयटी’च्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती सहभागी होतील.
या सोहळ्यात ते सव्वा तास थांबतील. ‘व्हीएनआयटी’तून राष्ट्रपती १२.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे रवाना होतील व तेथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ते दुपारी १२.४० वाजता दिल्लीकडे प्रयाण करतील.
या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
संकेतस्थळावर होणार
थेट प्रक्षेपण

दीक्षांत समारंभात निवडक व्यक्तींनाच प्रवेश असला तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून हा समारंभ पाहता येणार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या संकेतस्थळावर या समारंभाचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार असून यामुळे सहजपणे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना सभागृहात प्रवेश नाही
यंदाचा दीक्षांत समारंभ विशेष असल्यामुळे ‘व्हीएनआयटी’त तयारीदेखील त्याच पद्धतीने सुरू आहे. केवळ ३६ विद्यार्थ्यांचा मंचावर सत्कार करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे केवळ ‘पीएचडी’, ‘बीटेक’ व ‘बीआर्क’च्या विद्यार्थ्यांनाच सभागृहाच्या आत प्रवेश देण्यात येणार आहे. ‘एमटेक’ व ‘एमएस्सी’च्या विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था संगणक विज्ञान विभागाजवळील शामियान्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची बसण्याची व्यवस्थादेखील इथेच करण्यात येणार आहे.
सुरक्षेवर विशेष भर
कार्यक्रमादरम्यान सुरक्षाव्यवस्थेवर ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने विशेष भर दिला आहे. निवडक लोकांनाच सभागृहाच्या आत प्रवेश राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘पास’ तयार करण्यात आले आहे. सभागृहाच्या आत छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली असून कॅमेरा तसेच मोबाईल आणण्यासदेखील बंदी आहे. १४ सप्टेंबर रोजी ‘व्हीएनआयटी’ सभागृहात दीक्षांत समारंभाची रंगीत तालीम घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना यासाठी बोलविण्यात आले आहे.

Web Title: VNIT will be honored with 36 skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.