ब्रिटिशकालीन परंपरेला ‘व्हीएनआयटी’ चा छेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:27 PM2018-09-13T23:27:16+5:302018-09-13T23:30:03+5:30
दीक्षांत समारंभ म्हटले की डोळ््यासमोर येतात ते काळी ‘कॅप’ व काळा ‘गाऊन’ घेऊन पदवी हाती घेतलेले विद्यार्थी. ब्रिटिशांच्या काळापासून बहुतांश ठिकाणी पदवीदान करताना असाच पोशाख असतो. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोळाव्या दीक्षांत समारंभादरम्यान या परंपरेला छेद देण्यात येणार आहे. ‘कॅप’ व ‘गाऊन’चा ‘ड्रेसकोड’ यंदापासून बंद करण्याचा निर्णय ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेने घेतला आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षांत समारंभ म्हटले की डोळ््यासमोर येतात ते काळी ‘कॅप’ व काळा ‘गाऊन’ घेऊन पदवी हाती घेतलेले विद्यार्थी. ब्रिटिशांच्या काळापासून बहुतांश ठिकाणी पदवीदान करताना असाच पोशाख असतो. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोळाव्या दीक्षांत समारंभादरम्यान या परंपरेला छेद देण्यात येणार आहे. ‘कॅप’ व ‘गाऊन’चा ‘ड्रेसकोड’ यंदापासून बंद करण्याचा निर्णय ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेने घेतला आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले ‘एनआयटी’ ठरले आहे.
‘व्हीएनआयटी’चा सोळावा दीक्षांत समारंभ अभियंता दिन म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा दीक्षांत समारंभ वेगळा ठरावा असा प्रशासनाचा मानस होता. ‘ड्रेसकोड’बाबत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे विचारणा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रिटिशकालीन ‘ड्रेसकोड’ नको, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर वरील प्रस्ताव ‘व्हीएनआयटी’च्या विधिसभेसमोर मांडण्यात आला. विधीसभेच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यंदा विद्यार्थ्यांना ‘कॅप’ व ‘गाऊन’ घालून येण्याची गरज नाही. ते केवळ पांढरा शर्ट व काळी पॅन्ट किंवा पांढरा सलवार-साडी या पोशाखात येऊ शकतात, असे ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी सांगितले.
केंद्र शासनाशी निर्णयाचा संबंध नाही
काही लोक आमच्या या निर्णयावर नाराजी दाखवू शकतात. मात्र विद्यार्थ्यांच्या संमतीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र भारतात ब्रिटिशांची परंपरा किती काळ चालणार असा सवाल जामदार यांनी केला. संबंधित निर्णय आमच्या विधिसभेचा आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी याचा काहीही संबंध नाही, असे संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षीपासून पारंपरिक पोशाख
‘व्हीएनआयटी’मध्ये देशातील विविध भागांतून विद्यार्थी शिकायला येतात. त्यामुळे पुढील वर्षीच्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या भागातील परंपरेनुसार पारंपरिक पोशाख घालून येण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी दिली.
यंदा सर्वाधिक ‘पीएचडी’
‘व्हीएनआयटी’च्या सोळाव्या दीक्षांत समारंभात ७७ विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकडा आहे. सोबतच ३०७ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५५ जणांना ‘एमएस्सी’, तर ६७२ विद्यार्थ्यांना ‘बी.टेक.’पदवी प्रदान करण्यात येईल. ५७ जणांना ‘बीआर्क’ ही पदवी देण्यात येईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ‘टाटा केमिकल्स’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन हे उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला कुलसचिव डॉ.शैलेश साठे व अधिष्ठाता (अॅकेडेमिक्स) डॉ.एस.बी.ठोंबरे हेदेखील उपस्थित होते.